You are currently viewing वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन
Oplus_16908288

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन

वयाच्या २६व्या वर्षी बनले होते लोकनियुक्त नगराध्यक्ष; शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी तसेच ज्येष्ठ नेते शिवाजी रमाकांत कुबल (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वेंगुर्ला शहरासह राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवाजी कुबल हे वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मित्र होते. तसेच विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ते मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.

अवघ्या वयाच्या २६व्या वर्षी ते वेंगुर्ला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेने स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत पुरस्कारही पटकावला होता.

कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्य सरकारकडून कृषिभूषण आणि कृषिरत्न यांसह अनेक सन्मान मिळाले होते. तसेच ते दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे १५ ते २० वर्षे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत होते. वेंगुर्ल्यातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या स्थानिक संचालक मंडळावरही त्यांनी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या पश्चात पुतणे, पुतण्या, भावजया, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वेंगुर्ला तालुक्याने एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा