वैभववाडीत च पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार : पालकमंत्री नितेश राणे
*नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार*
कणकवली :
नाधवडे येथील एमआयडीसी ची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून दिली.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.ही बैठक अतिशय सकारात्मक झाली. नाधवडे गावाचे मुंबई मंडळ तसेच गावातील महत्त्वाच्या ग्रामस्थांनी त्या जमिनीसंदर्भातील महत्त्वाची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली. १९९६ पासून आजपर्यंत त्या जमिनीचा इतिहास समजून घेतल्यानंतर आणि ग्रामस्थ तसेच मुंबई मंडळाच्या भावनांचा आदर ठेवून आम्ही ती जमीन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे वैभववाडीमध्ये येणारी एमआयडीसी नाधवडे येथील प्रस्तावित जागेऐवजी दुसऱ्या पर्यायी जमिनीवर उभारली जाणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्यात आले असून वैभववाडी तालुक्यातच योग्य पर्यायी जमीन शोधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
लवकरच पर्यायी जमीन निश्चित होईल आणि वैभववाडी तालुक्यात एमआयडीसी निश्चितपणे उभी राहील. एकदा एमआयडीसी आली की, प्रस्तावित कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाचा एका बाजूला कोल्हापूरला तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीमुळे वैभववाडीला मोठा फायदा होईल. औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
तसेच, वैभववाडीच्या विकासाचा प्रवास सकारात्मक पद्धतीने सुरू राहील आणि फक्त जागा बदलली असली तरी एमआयडीसीचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वैभववाडी तालुक्यातच साकार होणार असल्याची ग्वाही त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सर्व नागरिकांना दिली.
