You are currently viewing SIR-2026 मोहिमेतील डिजिटायझेशनचे काम विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

SIR-2026 मोहिमेतील डिजिटायझेशनचे काम विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

SIR-2026 मोहिमेतील डिजिटायझेशनचे काम विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सावंतवाडीतील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; सावंतवाडीत कामाला गती देण्याचे निर्देश, वेंगुर्ला-दोडामार्गातील प्रगती समाधानकारक

सावंतवाडी : प्रतिनिधी

विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-2026 मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित सर्व कामे विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (सुपरवायझर) यांची आढावा बैठक सावंतवाडी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी वीरसिंह वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, ओंकार ओतारी आणि राहुल गुरव उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक तालुक्यातील कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील डिजिटायझेशनच्या कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आणून देत, ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) कामाची प्रगती कमी आहे त्यांना आवश्यकतेनुसार अधिक मदतनीस उपलब्ध करून कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील काम समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सातत्य ठेवून निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बीएलए) यांचे सहकार्य घेऊन काम प्रभावीपणे पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-2026 कार्यक्रम राबविण्यात येत असून, सुधारित वेळापत्रकानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन Enumeration Forms चे वितरण, भरलेले फॉर्म संकलित करणे आणि त्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम करत आहेत.
या मोहिमेत फॉर्मचे शंभर टक्के वितरण पूर्ण झाले असून, सध्या भरलेल्या फॉर्मचे संकलन व डिजिटायझेशन सुरू आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून निर्धारित कालावधीत मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा