जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपा कडून सत्कार
सिंधुदुर्ग
जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रकाश रेगे हे सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी रेगे यांचे अभिनंदन करताना जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आरवलीचे सरपंच तथा भाजप तालुका पदाधिकारी समीर कांबळी, शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा भाजप युवा नेते संतोष धानजी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रकाश रेगे यांनी जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहून संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. अध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
