You are currently viewing झाराप-आकेरी मार्गावर एसटीची कारला जोरदार धडक

झाराप-आकेरी मार्गावर एसटीची कारला जोरदार धडक

झाराप-आकेरी मार्गावर एसटीची कारला जोरदार धडक; मोठी दुर्घटना टळली

कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात; कारचे मोठे नुकसान, प्रवासी व दोन्ही चालक सुखरूप

कुडाळ

झाराप-आकेरी मार्गावरील हुमरस खान मोहल्ला येथे आज सकाळी सावंतवाडी-रत्नागिरी एसटी बसने समोर अचानक थांबलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कार चालक, एसटी चालक आणि बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एसटी बस (चालक अमोल बाबाराव कुळसंगे, वय ३५, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) नियमित मार्गावरून प्रवास करत होती. झाराप-आकेरी मार्गावरील हुमरस खान मोहल्ला परिसरात एसटीच्या पुढे असलेल्या कारचे चालक पांडुरंग श्रीधर नाईक (वय ५४, रा. नेरूरपार, कुडाळ) यांनी अचानक ब्रेक दाबल्याने कार रस्त्यात थांबली. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एसटी चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता न आल्याने बसने कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस किरण पिळगांवकर, प्रतीक सुभेदार, स्वप्नील पांगम तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून, उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा