पुणे :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पवित्र आषाढी पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी साहित्य सम्राट पुणे ही संस्था अनेक दिंड्यांमध्ये कवीसंमेलन घेऊन काव्य सुमनांनी पांडुरंगाची भक्ती करत असते. यावर्षी संस्थेचे हे २२७ वे कविसंमेलन अमरावतीच्या दिंडीमध्ये महात्मा फुले महाविद्यालय बंटर हायस्कूल गाडीतळ हडपसर येथे संपन्न झाले.
कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय माणिक आवळे सर, दिंडी प्रमुख आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भारत महाराज घोगरे, सुप्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी, संस्थापक अध्यक्ष चतुरस्त्रकवी विनोद अष्टुळ, रानकवी जगदीप वनशिव, शाहीर शिवाजी थिटे विचार पिठावर होते.
पांडुरंग परमात्म्याची भक्ती ही आपापल्या कलागुणांनी करता येते. वारकरी, टाळकरी, भजनी, मृदंगवादक, पेटीवादक, गायक, स्वयंपाकी, नाचणारे, टाळ्या वाजवणारे आणि शांत बसून आनंद घेणारे सुद्धा आपापल्या पद्धतीने भक्तीच करत असतात. आमची दिंडी रोज अठरा तास भक्तीत मग्न असते. प्रत्येक वर्षी साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदमाऊली हे आपल्या कवी कवयित्रींना घेऊन दिंडीतील कवीसंमेलन हा उपक्रम मोठ्या भक्ती भावाने राबवीत असतात. यंदाही आम्हा दिंडीकरांना कवितेच्या भक्तिरसाची अमृतमय अनुभूती लाभली आहे. असे विचार ह.भ.प. भारत महाराज घोगरे यांनी व्यक्त केले.
उपस्थित भक्त भाविकांना काव्यमय भक्तीरसात चिंब भिजवणारे कवी वारकरी शाहीर शिवाजी थिटे, शांतिनाथ ननावरे, गौरव नेवसे, स्नेहल भोसले, डॉ.केशवराव घोगरे, अर्चना मेटे, शिवाजी कदम, डॉ.मनोज लडकत, उत्तम महाराज शेलार, भडंगे महाराज, शेषराव माऊली डोकरे आणि इतर पंचवीस कवी कवयित्री आणि वारकरी यांनी आपल्या काव्यरचना, गाणी, ओवी, गवळण, भारुड, अभंग, पोवाडा असे विविध काव्यप्रकार सादर करून दिंडी कवी संमेलनाची अविस्मरणीय रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ, सूत्रसंचालन जगदीप वनशिव आणि आभार माणिक आवळे सर यांनी व्यक्त केले. शेवटी सामूहिक पसायदानाने कवी संमेलनाची सांगता झाली.
