नीट – यूजी २०२६ (NEET-UG) मध्ये अतुल्या डोंगरेची देदीप्यमान भरारी; ६७० गुणांसह देशात ४९८ वा क्रमांक
पिंपरी
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट – यूजी (NEET-UG) २०२६ मध्ये वाकड येथील अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने ७२० पैकी ६७० गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने ९७.६ टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केल्यामुळे तिने नीट परीक्षेची तयारी शिस्तबद्ध पद्धतीने केली.
यशाचे श्रेय देताना अतुल्या म्हणाली, ‘नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी मी कायम जोपासल्या. अभ्यासातील शंका तत्काळ शिक्षकांकडून दूर करून घेतल्या. जीवशास्त्रासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला, तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी भरपूर प्रश्नांचा सराव केला. परीक्षेच्या काळात तणाव होता; मात्र पालक आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास कायम राहिला.’
भविष्यातील नियोजनाबाबत ती म्हणाली, ‘उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पुढे आवडीच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवायचे आहे. त्यानंतर देशातच राहून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे.’
अतुल्याचे वडील बाळासाहेब डोंगरे म्हणाले, ‘डॉक्टर होण्याचा निर्धार तिने बालपणापासून केला होता. त्या दिशेने तिने सातत्याने मेहनत घेतली. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिलो. तिच्या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.’
आई शर्मिला डोंगरे म्हणाल्या, ‘अतुल्या लहानपणापासून अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती आहे. एखादे उद्दिष्ट निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नाही. तिच्या मेहनतीचे आज सार्थक झाले असून तिच्या यशाचा आम्हाला खूप आनंद आहे.’
नीट – यूजी
(NEET-UG) २०२६ मधील या उल्लेखनीय यशामुळे अतुल्या डोंगरेने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
