You are currently viewing सावंतवाडी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे काम कौतुकास्पद – लखमराजे भोसले;

सावंतवाडी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे काम कौतुकास्पद – लखमराजे भोसले;

संघटनेच्या माध्यमातून विविध मान्यवरांचा सत्कार….

सावंतवाडी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी जीवनभर सर्व सामान्य माणसाचा विचार केला. त्याला मोठं केलं. सावंतवाडी ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेने देखील जनसेवा हीच महत्त्वाची भूमिका बजावत मान्यवरांचा सन्मान केला, हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले.
सावंतवाडी ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या २५ व्या शिवजयंती सोहळा निमित्त श्री देव नारायण मंदिर मध्ये आयोजित सत्यनारायण पूजा आणि मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी श्री भोसले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, जिल्हा परिषद माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर ,सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे सेक्रेटरी सुधीर पराडकर, कोकण विभागीय रिक्षा संघटना व ह्युमन राइटचे संतोष नाईक, डॉ. प्रवीण मसुरकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. सतीश बागवे, मामा ओरसकर, रिक्षा अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, उपाध्यक्ष महादेव बामणे, रिक्षा पतसंस्था अध्यक्ष शामसुंदर नाईक, खजिनदार जयवंत टंगसाळी, सेक्रेटरी सदानंद धर्णे, मनोहर मसुरकर, सुभाष तावडे, संजय गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री भोसले म्हणाले, रिक्षा सेना संघटनेने रक्तदाते, रिक्षा चालक मालकीच्या पाल्यांचे, यशवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करुन शिवजयंतीला मानाचा मुजरा केला. आपण सर्व जण सामाजिक भावनेतून हे काम करत आहात त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो.
शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्याची निर्मिती करून अलौकिक जलदुर्ग उभा केला. आपण तो अभ्यासला पाहिजे. हिंदवी स्वराज्य व्हावे म्हणून त्यांनी केलेले कार्य जगभर गौरवीले जाते. त्यांनी आचार, विचार आणि कृतीतून स्वराज्य निर्माण केले त्याचा अभ्यास करून अंगिकार करावा.

यावेळी ऑटो रिक्षा सेना युनियनचे जिल्हा सरचिटणीस सुधीर पराडकर म्हणाले, सावंतवाडी मध्ये ऑटो रिक्षा सेना १९९० मध्ये स्थापन करण्यात आली त्यानंतर श्री देव नारायण मंदिर मध्ये १९९६ पासून सत्यनारायण महापूजा घालण्यात येत आहे. हे कार्य अविरतपणे सुरू असून ऑटो रिक्षा सेनेची पतसंस्था देखील निर्माण करण्यात आली आहे. कोविड काळामध्ये सुद्धा रिक्षा चालकांनी सेवाभावी काम केले तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेला समाजातील मान्यवरांनी मदत केली अशा सर्व समाज बांधव रिक्षा चालक-मालक,पाल्य आणि रक्तदाते अशा मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा