You are currently viewing माडखोलमध्ये बागकाम करताना फुरसाचा दंश; शिवाजी राऊळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

माडखोलमध्ये बागकाम करताना फुरसाचा दंश; शिवाजी राऊळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

माडखोलमध्ये बागकाम करताना फुरसाचा दंश; शिवाजी राऊळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

खताच्या पिशवीत लपलेल्या विषारी सापाने घेतली झेप; साप सोबत आणल्याने उपचाराला झाली मदत, प्रकृती स्थिर

सावंतवाडी :

तालुक्यातील माडखोल येथील शिवाजी शंकर राऊळ यांना गुरुवारी सकाळी बागकाम करत असताना फुरसा या विषारी सापाने दंश केला. ही घटना सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
माडखोल येथील बाबनादेवी स्वामी समर्थ मठ परिसरात वास्तव्यास असलेले शिवाजी राऊळ हे आपल्या बागेत लेंडी खत टाकण्याचे काम करत होते. खताच्या पिशवीत फुरसा लपून बसला होता. पिशवीतून खत काढण्यासाठी ते खाली वाकताच सापाने झेप घेत त्यांच्या पोटावर दंश केला.
दंश झाल्यानंतरही शिवाजी राऊळ यांनी धाडस दाखवत काठीच्या साहाय्याने फुरसाला ठार केले. त्यानंतर सापाला प्लास्टिकच्या पिशवीत भरून पत्नी शारदा राऊळ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयात आणले. सर्पाची अचूक ओळख पटून योग्य उपचार करता यावेत, यासाठी त्यांनी साप डॉक्टरांना दाखविला.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रथम रक्त तपासणी करून विषाचा परिणाम तपासण्यात आला. त्यानंतर आवश्यक इंजेक्शन व औषधोपचार सुरू करण्यात आले. डॉ. मानसी बालाजी बनसोडे (एमबीबीएस) तसेच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती समाधानकारक आहे.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच पावसाळ्यात शेत व बागेत काम करताना सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी गमबूट, हातमोजे यांसारखी संरक्षणात्मक साधने वापरून आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा