*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
*वडाची पूनाव*
आज वटपौर्णिमा होती. काकल्या साधारण दहाच्या दरम्यान आमच्या घरी आला. म्हणाला, “काय, मगे वैनीन खांदले पूजले मा?” एकंदरीत पहिलीच ओव्हर शॉर्ट बोलने सुरू झाली होती.
“अरे, वटपूजन केलं. भले वडाच्या फांद्या असतील. तू खांदल्या काय म्हणतोस?” मी सावधपणे खेळलो.
“बऽरा, तुमी वडाच्या पूनवेक वड तोडतांस काय पूजतांस?” काकल्याने याॅर्कर टाकला.
“अरे मी नाही तोडत. बाजारातून दोन फांद्या आणल्या पूजनासाठी.”मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.
“हुंजे कोणीतरी तोडलेच मा? आदल्या दिसा तुमी वड बोडकायतास आनी दुसरे दिसा पूजतास.” काकल्याने डॉट बॉल टाकला.
काकल्या दुसरी ओवर सुरू करत होता, पण मी म्हणालो, “अरे, आपला धर्म, आपली परंपरा आपण सांभाळायला नको काय?” मी एक रन काढण्याचा प्रयत्न केला.
“मी खूय नको हून्तय. पूजा करा, पून वडाकडे जावन् पूजा त्येका. वडाक घरात हाडू नकास.”
“म्हणजे निश्चित काय करायला हवं?” मी गॅप शोधत गलित चेंडू ढकलला.
“अरे, सोप्या हा. सावित्रीन आपल्या सासू-सासऱ्याचा, घोवाचा, कुटुंबाचा भला केला, तसाच जर आजचे बायले कुटुंब समाळीत आसतीत, नोकरी करीत नायतर भले कोणाकडे धुणीभांडी करून संसार चलयत् आसतीत; तर तेंका असली अवडंबरा करूची गरज नाय. गावातल्या वडाक हात जोडायचो, झाला. उलट ह्यो दिस दादल्यानी समजान घेवक् होयो. पून त्येंचा न्हयताच चल्लाहा.”
मी न समजल्यासारखे केले. त्यावर काकल्याने इनस्वींग टाकला, “हाली हुंता झिलगेय वडाक फेरये मारतत. हेका बायलेवरचा पिरेम म्हणायचा काय चमकूगीरी?” मी बाॅल सोडून दिला.
“नाय, बायलांचा कौतिक करूचा हा तर तिका येक दिस इस्रांती दिया. जेवाण,भांडी, कचरो, लादी सगळा तुमी करा मरे. बरा, परंपरावाल्यांकाय या आवडाचा नाय, कारण तेंच्या मतापरमाने व्रताबिता ह्यो बायलांचो इषय. “काकल्याने एंड बदलला होता.
“आनी ते चिकट गरे पावसाच्या दिसात कित्याक रे. फुक्कट पोटा खराब जातत मरे. काळापरमाणे सण- रितीत बदल जावक् होयो. ते काळे पिरडुके,अन्शीचे दोरे आता उपेगाचे नाय.” काकल्या सोडत नव्हता.
“मग हे सोडून द्यायचं?”
“नाय. सगळे सण होये, तशी पूनाव होयीच. जर आदल्या दिसा झिलग्यानी गावातल्या वडाकडली जागा साफ केली, दुसरे दिसा शक्य हा त्या बायलानी वडाची पूजा केली; तर ती खरी वडाची पूनाव.”
“म्हणजे तू परंपरेच्या बाजूने तर. “मी चौकार ठोकण्याचा प्रयत्न केला.
“मी काळाच्या बाजून. अरे,सद्याच्ये सत्यवान दुसर्याच्ये सावित्री घेवन् झारेपक घसरान पडतहत. यम गेली अठरा वर्सा सासश्ट नंबरच्या म्हामार्गारच आसा; ह्या खरा दुख आसा. याक धेनात ठेया,धर्म जगाक शिकयता, कश्टावक् नाय.”
काकल्याने सामना संपवला होता.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802