मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक महावितरणला अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश
सावंतवाडी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून महावितरणचे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत चालू अधिवेशन सोडून तातडीने मतदारसंघात परतलेले आमदार दीपक केसरकर यांनी आज महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
या वादळामुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उद्या मुंबईमध्ये ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या आठ दिवसांपासून वीज नसल्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महामार्गावर साचलेल्या पाण्याचा तातडीने बंदोबस्त करणे आणि वीजवाहिन्यांवर पडणारी झाडे कापण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरू होईल, तर उर्वरित भागातील वीजपुरवठा पुढील दोन दिवसांत पूर्णपणे सुरळीत केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासाठी वाहन, कटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली असून आठवडाभरात यावर ठोस कार्यवाही करण्यात येणार आहे. वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामाचा वेग वाढवण्यासाठी लागणाऱ्या गाड्या भाड्याने घेतल्यास त्याचे भाडे तसेच वीजवाहिन्यांवरील झाडे कापण्यासाठी लागणारे कटर खरेदीचे पैसे आपण स्वतः देणार असल्याचे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले.
भविष्यात अशा आपत्तींचा फटका बसू नये म्हणून किनारपट्टीसह इतर भागात ‘अंडरग्राऊंड’ म्हणजेच भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारल्यानंतर मतदारसंघातील इतर प्रश्नही मार्गी लावले जातील, असे सांगत दीपक केसरकर यांनी झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कठीण काळात संयम राखल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आणि पुढील दोन दिवसांत परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
