You are currently viewing मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ

मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ

मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ

डेंग्यू-मलेरियाचा धोका लक्षात घेऊन पालिकेची तातडीची कारवाई; सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने फवारणी

मालवण

शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या सूचनेनुसार मालवण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून शहरात व्यापक डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
शहरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने फवारणी केली जाणार आहे. शहरातील कोणताही परिसर वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
फवारणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका नीना मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम श्री. वळंजू तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि फवारणी पथक उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही पालिकेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, शहरात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देता स्वच्छता राखून पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा