You are currently viewing गोव्यात कामासाठी ये – जा करणाऱ्या युवकांसाठी काढणार तोडगा

गोव्यात कामासाठी ये – जा करणाऱ्या युवकांसाठी काढणार तोडगा

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांची ग्वाही

भाजपा शिष्टमंडळाने भेट घेत केली मागणी

सावंतवाडी

गोव्यात कामानिमित्त नियमित ये-जा करणाऱ्या युवकांची तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्ट न करता केवळ “टेंपरेचर” चेक करून गोव्यात प्रवेश देण्यात अशा सूचना सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेल्या असताना गोवा राज्यातील नाक्यांवर मात्र त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन गोवा मांद्रा मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.

आरोंदा सातार्डा तसेच सावंतवाडी तालुक्यातील अनेक युवक गोवा येथे नियमित कामाला जातात. अशा युवकांना गोवा राज्यातील नाक्यावर कोरोना तपासणी अहवाल द्यावा लागतो अथवा त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करणे. बंधनकारक आहे. मात्र, नियमित ये जा करणाऱ्या तरुणांना यात सूट देण्यात यावी त्यांचे केवळ टेंपरेचर चेक करून त्यांना येण्याजाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने आमदार दयानंद सोपटे यांची भेट घेऊन केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, आरोंदा सरपंच सुप्रिया पार्सेकर, उपसरपंच सुभाष नाईक, जेष्ठ मानकरी बबन नाईक, ग्रामपंचायत सदस्य काका आचरेकर, सिद्धेश नाईक, सायली साळगांवकर, गितांजली वेर्णेकर, भाजपा कार्यकर्ते रोशन परब, आबा सातोस्कर, सहदेव साळगावकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपच्या या मागणीनंतर तहसीलदारांनी त्वरीत हा निर्णय घेतला. याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले.

गोव्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या मुलांना तात्काळ हजर व्हा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा सूचना गोमंतकातील संबंधित आस्थापनांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत गोव्यात ये जा करण्यासाठी कोरणा तपासणी अहवाल अनिवार्य असल्यामुळे युवकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांना केवळ टेंपरेचर चेक करून येण्या जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी अनेक भाजपा शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. त्याबाबत आ. दयानंद सोपटे यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्याने आता या युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा