४ जुलै रोजी ओरोस येथे ‘निरामया आरोग्य विमा योजना’ व कायदेशीर पालकत्व मार्गदर्शन शिबिर
बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग व ऑटिझम दिव्यांगांच्या पालकांना लाभ; ३० जूनपर्यंत नोंदणी आवश्यक
सिंधुदुर्ग :
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आणि डीडीआरसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘निरामया आरोग्य विमा योजना’ व कायदेशीर पालकत्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन हॉल, ओरोस येथे होणार आहे. बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग व ऑटिझम असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी या शिबिरास उपस्थित राहून योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरामध्ये निरामया आरोग्य विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून औषधोपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण, तसेच कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित विषयातील तज्ज्ञ पालकांच्या शंकांचे निरसनही करणार आहेत.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, दिव्यांग सक्षम अधिकारी तसेच महात्मा गांधी सेवा संघाचे डायरेक्टर विजय काणेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी ३० जून २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून, लाभार्थींनी आधार कार्ड, रेशन कार्ड, यूडीआयडी (स्वावलंबन कार्ड), अपंगत्व प्रमाणपत्र, पॅन कार्ड, दोन छायाचित्रे आणि बँक पासबुक यांच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे (मो. ९७६५९७९४५०), कार्यालय (९६२३६५५१४२) अथवा डीडीआरसी (९३२२०७३९९२) येथे संपर्क साधावा.
