*शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता*
*भावपूर्ण वातावरणात दुर्गा मातेचे विसर्जन ; भाविकांचे डोळे पाणावले*
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील शिरवल-खासकीलवाडी येथील संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची अत्यंत भक्तीमय, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात सांगता झाली. यंदा सलग आठव्या वर्षी आयोजित या उत्सवामुळे संपूर्ण खासकीलवाडी परिसरात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर सुरु होता.
उत्सवा दरम्यान दररोज भल्या पहाटेपासून नियमबद्ध विधिवत पूजा, सामूहिक आरती आणि भजनांचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी महिला व युवतींनी पारंपरिक गीतांवर फुगड्यांचे फेर धरल्यामुळे वातावरणात विशेष चैतन्य निर्माण झाले होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच पारंपरिक ‘डबलबारी’ भजनांचा सामना, प्रसिद्ध ‘दशावतार नाटक’ आणि महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’सारखे मनोरंजनपर खेळ , महिलांसाठी हळदीकुंकू,महिलांसाठी आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या दुपारी आणि रात्रीच्या महाप्रसादाचा (भंडारा) शिरवल परिसरासह आजूबाजूच्या गावांतील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. अत्यंत तृप्त भावनेने भाविकांनी या अखंड अन्नदानाचा आस्वाद घेतला.
उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी दूर्गामातेची विशेष महापूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भजनांच्या सुरात आणि ‘दुर्गामाता की जय’च्या जयघोषात दूर्गामातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी
संदीप चौकेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा
प्राण जीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक संदीप चौकेकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकृष्ण यादव, मनोज राणे,
विजय चौकेकर, दत्ताराम पेडूरकर, वसंत पेडूरकर,अनिप सावंत, चेतन शिरवलकर,रामचंद्र गोळवणकर, कृष्णा गावडे, रामचंद्र गावडे, राजाराम दळवी, ओमकार देसाई,अरुण चौकेकर,अजय चौकेकर, तेजस चौकेकर, रूप रुपेश चौकेकर,समीक्षा संदीप चौकेकर, कविता गावडे, आरती गावडे, जयश्री चौकेकर, श्रद्धा यादव, आणि पल्लवी पेडूरकर आदी उपस्थित होते.
*जड अंतःकरणाने देवीला निरोप देत या सोहळ्याचा समारोप झाला.*
शिरवल सावरभाटलेवाडी येथील बंधाऱ्याच्या पाण्यात संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने बसवण्यात आलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
विसर्जनापूर्वी खासकीलवाडी ते सावरभाटलेवाडी बंधाऱ्यापर्यत देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांची जुगलबंदी आणि ‘दुर्गा माता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. महिलांनी जागोजागी मातेची आरती करून मनोभावे दर्शन घेतले आणि सुख-समृद्धीचे साकडे घातले.
सावरभाटलेवाडी येथील बंधाऱ्यावर पोहोचल्यानंतर तेथे महाआरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत भाविकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षिततेची काळजी घेत दुर्गा मातेच्या मूर्तीचे बंधाऱ्याच्या पवित्र पाण्यात जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले. नऊ दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या मातेला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते. या सोहळ्यासाठी खासकीलवाडी, सावरभाटलेवाडी आणि शिरवल परीसरातील अबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिला मंडळाने व स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व स्तरांतून या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक होत आहे.
