सिंधुदुर्ग : ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करणे, रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ठेवणे, तसेच बँका व ग्रामपंचायतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करणे, नियमानुसार गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारणे, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपीडीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिले.
या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य राजस रेगे, सखाराम सपकाळ, संतोष चिकणे, सदस्य सचिव, श्रीकृष्ण महिला बाल कल्याण अपंग पुनर्वसन विकास मंडळ, जळगाव या संस्थेचे प्रतिनिधी, तसेच संबंधित विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
