*मराठी, हिंदी, इंग्रजी कविता आणि गझलच्या २४ तास सादरीकरणाचा होणार विश्व विक्रम*
डिचोली: गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तेथील समुद्रकिनारे, चर्च आणि पर्यटन उभे राहते ,परंतु गोव्याला साहित्याची संगीताची, भाषेचीही समृद्ध परंपरा लाभलेली आहे हे विसरून चालणार नाही. उत्तर गोव्यातली डिचोली ही पवित्र भूमी अशाच सांस्कृतिक साहित्यिक परंपरेची साक्ष देणारी आहे. याच डिचोलीत २७ जून रोजी सकाळी ११.०० ते २८ जून सकाळी ११.०० वाजेपर्यंत अखंड २४ तास गझलकार श्री.दत्तप्रसाद जोग हे वृत्तबद्ध कविता व गझल सादर करून विश्वविक्रम नोंदविण्याचा धाडसी प्रयत्न करणार आहे. हा विक्रम केवळ वेळेचा नसेल तर तो त्यांच्या अभ्यासाचा, काव्यनिष्ठेचा व साहित्यावरील प्रेमाचा असेल. गझल हा केवळ काव्यप्रकार नाही तर वृत्त, मात्रा यमक, रदिफ व आशय यांचा सुरेख मिलाफ! हे सगळे साधून रसिकांच्या मनात स्थान मिळविणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु, हे शिवधनुष्य डिचोलीच्या दत्तप्रसाद जोग ह्या तरुणाने उचलण्याचा निश्चय केला आहे. ह्या साठी त्यांचे जितके कौतूक करावे तितके कमीच ठरेल.
या उपक्रमासाठी दीनदयाळ शिक्षण संस्था(डिचोली) ने पुढाकार घेतलेला आहे. ही संस्था आपल्या अभिनव उपक्रमासाठी रसिकांना परिचित आहे. त्यांच्याच सहकार्याने गझलकार , कवी, गीतकार व हिंदी रामायण अनुवादक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री दत्तप्रसाद जोग आपल्या ५०० हुन अधिक मराठी, कोकणी, हिंदी, मालवणी, चित्पावनी आणि इंग्रजी कवितांचे सलग २४ तास सादरीकरण करतील. हा भव्य दिव्य कार्यक्रम पंडित दीनदयाल सभागृह डिचोली येथे संपन्न होईल अशी माहिती अध्यक्ष श्री.वल्लभ साळकर, सिद्धी प्रभू, कांता पाटणेकर यांचेकडून मिळाली आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रेमेन्द्र शेट यांचे हस्ते उद्या २७ जूनला सकाळी १०.०० वाजता होणार असून प्रमुख अतिथी म्हणून गोवा कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष श्री रमेश घाडी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे ज्यूरो डॉ. विटो न्यूनिस, दीनदयाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री वल्लभ साळकर, कार्यक्रम संयोजिका सिद्धी प्रभू व उत्सवमूर्ती श्री दत्तप्रसाद जोग हजर असणार आहेत. २८ जूनला सकाळी ११.०० वाजता या अभिनव उपक्रमाची सांगता होईल व गोमंतकाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पानावर निःसंशय झळकणार! यावेळी आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये सुश्री सुलक्षणा सावंत , उत्तर गोव्यातील विविध शाळा, साहित्यिक, सांस्कृतिक संस्था व कवी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहेत.
डिचोलीच्या भूमीतून घुमणारे हे काव्यस्वर मराठी साहित्य विश्वाला व रसिकांना निश्चितच नवी ऊर्जा आत्मविश्वास व प्रेरणा देतील.
विक्रमाची नोंद इतिहासात नक्कीच होईल पण, दत्त प्रसाद जोग सरांच्या साहित्य प्रेमाची नोंद रसिकांच्या मनात होणारच ह्यात शंकाच नाही.
दत्त प्रसाद जोग यांच्या ह्या तेजस्वी साहित्य यज्ञाला मनापासून शुभेच्छा!
