You are currently viewing कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना विशेष दिलासा

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना विशेष दिलासा

एनडीआरएफच्या निकषांपलीकडे आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारची तयारी; विधानसभेत पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

मुंबई :

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची ग्वाही मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात दिली.

विधानसभेत कोकणातील आंबा आणि काजू नुकसानीच्या संदर्भात आमदार निलेश राणे, आमदार निकम व आणखीन काही आमदारांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री नितेश राणे हे सक्रिय असल्याने त्यांनी सभागृहात शेतकऱ्यांसाठी सरकार कोणत्या स्तरावर जाऊन काम करत आहे याबाबतची माहिती दिली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादकांच्या नुकसानीबाबत व्यक्त झालेली जनभावना सरकारने गंभीरपणे घेतली असल्याचे सांगितले. यंदा आंबा आणि काजू पिकांचे सुमारे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त आहे. आमदार निलेश राणे यांनी सभागृहात दिलेली माहिती बरोबर आहे. या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी विशेष बैठकही घेतली आहे. स्पेशल केस म्हणून मदत कशी देता येईल यासाठी राज्यसरकार तयार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.

राज्य सरकार या प्रकरणाला विशेष बाब म्हणून विचारात घेत असून, एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू उत्पादकांना यापूर्वी कधी मिळाली नसेल इतकी मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.

या घोषणेमुळे कोकणातील हजारो आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा