You are currently viewing सिंधुदुर्गला शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; १० कोटींचा निधी, १०० विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता
Oplus_16908288

सिंधुदुर्गला शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; १० कोटींचा निधी, १०० विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग :

केंद्र पुरस्कृत “नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. या प्रत्येक महाविद्यालयासाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला संलग्न बीएससी नर्सिंग महाविद्यालय नव्याने मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यात आरोग्य शिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यानिमित्ताने यश मिळाले आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहारालाही यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध जिल्ह्यांमध्ये नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने या नर्सिंग महाविद्यालयासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

१०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे हे नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात कुशल परिचारिका तयार होऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्याबद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा