You are currently viewing स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करा; ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध

स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करा; ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध

स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करा; ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध

लेखी व तोंडी पूर्वकल्पना देऊनच मीटर बदलले जातात; जास्त बिल येण्याचा संबंध नाही – अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख

सिंधुदुर्ग :

स्मार्ट मीटरबाबत समाजात पसरलेले अनेक गैरसमज चुकीचे असून भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि महावितरणच्या आधुनिकीकरण धोरणांतर्गत सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, मानवी हस्तक्षेपाशिवाय रीडिंग, वीज वापरावर नियंत्रण तसेच मोबाईलद्वारे वीज वापराची माहिती मिळण्यासारखे अनेक फायदे ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. ग्राहकांना न विचारता मीटर बसविले जातात किंवा स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येते, या विषयावर बोलताना श्री. राख यांनी हे स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले की, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना मोबाईल ॲपवर वीज वापराची माहिती मिळते आणि वापरावर नियंत्रण ठेवता येते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत होणाऱ्या वीज वापराची स्वतंत्र नोंद होत असून घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळते.
महावितरणकडून ग्राहकांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष तोंडी माहिती देऊनच मीटर बदलण्याची प्रक्रिया राबविली जाते. एखाद्या ग्राहकाने विरोध केल्यास त्याला स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगितले जातात. स्मार्ट मीटरमुळे जास्त बिल येते, हा समज चुकीचा असून जुना मीटर आणि स्मार्ट मीटर दोन्ही समान रीडिंग दर्शवितात. याची खात्री करण्यासाठी काही ठिकाणी दोन्ही मीटर एकत्र बसवून चाचणीदेखील करण्यात आली आहे. बिलामध्ये काही तफावत अथवा त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना मोबदला मिळण्याची तरतूद असल्याची माहिती देताना श्री. राख म्हणाले की, ग्रामीण भागात ४८ तासांपेक्षा अधिक काळ आणि शहरी भागात २४ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्यास ग्राहकांना मोबदला मिळू शकतो. मात्र त्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तक्रार केलेल्या अनेक ग्राहकांना मोबदला मिळालेला आहे.
पावसाळ्यात वीजांचा गडगडाट, जोरदार वारा किंवा अतिवृष्टीच्या परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवला जातो. ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हे निर्णय घेतले जात असल्याचेही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा