You are currently viewing लखनौने केला मुंबईचा पाच धावांनी पराभव; स्टॉइनिसचे अर्धशतक

लखनौने केला मुंबईचा पाच धावांनी पराभव; स्टॉइनिसचे अर्धशतक

*लखनौने केला मुंबईचा पाच धावांनी पराभव; स्टॉइनिसचे अर्धशतक*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ६३ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्सवर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ पाच गडी गमावून केवळ १७२ धावा करू शकला आणि सामना गमावला. लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार कृणाल पंड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले. मुंबईकडून इशान किशनने ५९ आणि रोहित शर्माने ३७ धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद ३२ धावा केल्या. लखनौच्या यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या विजयासह लखनौ १५ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून मुंबईला मागे टाकण्याची आरसीबीला संधी आहे. त्याचवेळी, चेन्नईचा संघ आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून दुसऱ्या स्थानावर राहू शकतो. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. इतर सर्व संघांना अंतिम चारमध्ये जाण्यासाठी उर्वरित साखळी सामने जिंकावे लागतील.

लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टॉइनिसचे नाबाद अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या संयमी खेळीच्या जोरावर तीन विकेट्सवर १७७ धावा केल्या. स्टॉइनिसने ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या, तर कृणालने ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. स्टॉइनिसने चार चौकार आणि आठ षटकार मारले. त्याचवेळी क्रुणालने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर क्रुणाल दुखापतग्रस्त होऊन तंबूमध्ये परतला. स्टॉइनिस आणि कृणाल यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूत ८२ धावांची भागीदारी करून संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून बाहेर काढले. एका टप्प्यावर लखनौची ३ बाद ३५ अशी अवस्था होती.

लखनौची धावसंख्या १७ षटकांत ३ बाद १२३ अशी होती, पण स्टोइनिसने १८व्या षटकात जॉर्डनला दोन षटकार आणि तीन चौकार मारून २४ धावा केल्या. त्याने १९व्या षटकात बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर दोन षटकार मारून १५ धावा केल्या. आकाश मेधवालने शेवटचे षटक टाकले आणि त्याने १५ धावा दिल्या. त्याच्या पाचव्या चेंडूवर जॉर्डनने पुरणचा झेल सोडला. स्टॉइनिसने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. स्टॉइनिस आणि पूरन यांनी पाचव्या विकेटसाठी झटपट २४ चेंडूत ६० धावांची नाबाद भागीदारी केली.

लखनौने क्विंटन डिकॉकसह दीपक हुडाला ओपनिंगसाठी पाठवून मोठा प्रयोग केला पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. जेसन बेहरेनडॉर्फने हळू चेंडू टाकला आणि हुडाला टिम डेव्हिडच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने प्रेरक मंकडला शून्यावर बाद केले. पॉवरप्लेपर्यंत लखनौचा संघ पहिल्या सहा षटकांत दोन गडी गमावून केवळ ३५ धावाच करू शकला. पुढच्याच षटकात चावलाने डिकॉकला आपल्या फिरकीत अडकवले, जो किशनला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर स्टॉइनिस आणि कर्णधार क्रुणालने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी खराब चेंडूंवर चौकार मारले आणि १४ षटकांत संघाची धावसंख्या १०० धावांपर्यंत नेली.

१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित आणि ईशान या जोडीने पॉवरप्लेमध्ये संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरप्लेमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता ५८ धावा केल्या. यानंतर रोहित शर्मा ३७ धावा करून रवी बिश्नोईचा बळी ठरला. पुढच्या षटकात किशनने आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु बिश्नोईने त्यालाही ५९ धावांवर बाद करून लखनौला सामन्यात परत आणले. हे दोघे बाद होताच मुंबईची धावगती मंदावली आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादवही सात धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवची रोहित शर्मा नेहमीच पाठराखण करतो, पण यादव, विराट कोहली प्रमाणेच बेभरवशाचा फलंदाज आहे.

११५ धावांवर तीन विकेट गमावल्यानंतर लखनौच्या खेळपट्टीवर मुंबईसाठी १७८ धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. अशा स्थितीत टीम डेव्हिडने नेहल वढेरासोबत भागीदारी केली, पण वढेरा २० चेंडूत १६ धावांची संथ खेळी खेळून बाद झाला. मात्र, टीम डेव्हिडने मोठे फटके खेळून मुंबईला सामन्यात रोखले. दरम्यान, दोन धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विष्णू विनोदही बाद झाला आणि मुंबई संघ अडचणीत आला.

सरतेशेवटी कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडने सर्व प्रयत्न केले, पण मोहसीन खानने शेवटच्या षटकात ११ धावा काढू दिल्या नाहीत. मुंबईचा संघ केवळ १७२ धावाच करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. लखनौकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहसीन खानला एक विकेट मिळाली.

मार्कस स्टोइनिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा