नागरिकांच्या सहमतीशिवाय बांदा शहरात स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत….
*गुरु कल्याणकर यांच्यासह उपसरपंच व नागरिकांनी घेतली महावितरणची भेट…*
बांदा (प्रतिनिधी) :
राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बांद्यातही नागरिकांमध्ये विविध शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिक प्रतिनिधींनी मांडली.
या चर्चेदरम्यान भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर आणि गंगाराम परब यांनी स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका असल्याचे सांगितले. ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महावितरणच्या बांदा शाखेचे उप-अभियंता साहील टाके यांनी नागरिकांना आश्वस्त करताना सांगितले की, “कोणत्याही ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत. तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व शंका व गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.”
दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचे निरसन करण्यासाठी महावितरणने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी यावेळी गुरु कल्याणकर यांनी केली . ग्राहकांचा विश्वास संपादन करूनच कोणतीही कार्यवाही करण्यात यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून बांद्यातील नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी सजग झाल्याचे दिसून येत असून, ग्राहकांच्या हिताशी तडजोड होणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
