You are currently viewing उष्णतेमुळे सिंधुदुर्गातील माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात

उष्णतेमुळे सिंधुदुर्गातील माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात

१९ ते ३० जूनदरम्यान सकाळी ७.३० ते ११.३० वेळेत वर्ग

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिक्षक परिषदेचा पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार असून पालक आणि शिक्षकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरणार आहेत.याबाबतचे लेखी आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी काढले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. विशेषतः दुपारच्या वेळेत शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना घराकडून शाळेत जाताना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत होता. दुपारच्या वेळी वर्गात कडक उष्णतेचा सामना मुलांना करावा लागत होता. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला.या निर्णयासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा परिषद प्रशासनाने आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी १९ जूनपासून सकाळच्या सत्रात वर्ग भरवावेत आणि ३० जूनपर्यंत बदललेले वेळापत्रक लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून शैक्षणिक कामकाजही सुरळीतपणे पार पाडता येणार आहे.दरम्यान, या निर्णयाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

या निर्णयाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जि.प.सदस्य रूपेश पावसकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर, मराठा शिक्षक संघटना,कास्ट्राईब शिक्षक संघटना,शिक्षक भारती या सर्वांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आभार व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या सकाळ सत्रातील शाळा भरविण्याबाबत सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता.आणि त्याला यश आल्याचा दावा करत या निर्णय घेतल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा