*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाच्या सन्मा.सदस्य नूतन पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*# ऋणानुबंध*
अंकुरलं बीज जेव्हा, ऋण घेऊन श्वासांचं,
घडला आकार माझा, रक्तातून घामांचं.
कोऱ्या कागदावर लिहिलं, स्वप्नांचं एक गाणं,
मी निघाले लढायाला, घेऊन स्वाभिमान.
उषःकालात जळले मी, वेदनेला कवटाळून,
तेजस्वी होऊनही, मुळाशी पाय रुतून.
आज जेव्हा मागे वळून बघते, दिसते जाणीव एक,
माझ्या जगण्यावर आहे, हजार हातांचा टेक.
काय देऊ परत त्यांना, ज्यांनी सर्वस्व दिलं?
श्वास देताना आईने, मरण डोळ्यात पेललं.
बाबांनी खांद्यावरचं, ओझं हसून वाहिलं,
या मातीने मला कुशीत, मायेसारखं वाढवलं.
देशाने ओळख दिली, समाजाने नाव दिलं,
नातेवाईकांनी मायेने, ऋणानुबंधाचे विणले गाव.
मित्रमैत्रिणींनी पाठीवरती, धीराची थाप दिली,
अनोळखी चेहऱ्यांनीही, वाट सुकर केली.
आता उगवलेला सूर्य मी, पणती होऊन जळणार,
माझ्या उजेडात त्यांचे, डोळे पुन्हा लखलखणार.
ज्यांनी बोट धरून चालवलं, त्यांची काठी होणार,
या मातीचं, माणसांचं, ऋण आता फेडणार.
त्यांनी पेरलेलं बीज मी, आज फुल होऊन उमले,
ज्यांच्या ऊबेत वाढले, त्यांच्यासाठीच दरवळे.
उद्या जर येईन पुन्हा, बीज होऊन रुजेन,
ज्या मातीने घडवलं, तिलाच शिवार करून जाईन.
– नूतन पाटील.
ठाणे
