धोकादायक व्यापारी मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांची नगराध्यक्षांकडे मागणी
नवीन व्यापारी संकुलात सर्वांना सामावून घेण्याची नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही
कणकवली
कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायतीच्या मालकीच्या व्यापारी मार्केटची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने नवीन व्यापारी संकुल उभारून विद्यमान व्यापाऱ्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी व्यापारी वर्गाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे केली.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधींनी सोमवारी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यावेळी नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांसोबत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नवीन व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात मार्गदर्शन करताना सर्व पात्र व्यापाऱ्यांचा विचार करून त्यांना नव्या संकुलात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
व्यापाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पूर्वीच्या भाजी मार्केटच्या ठिकाणी असलेली नगरपंचायतीची स्लॅबची इमारत जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहे. पहिल्या मजल्यावरील भिंती कोसळल्या असून इमारतीचा काही भागही ढासळला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्केटमध्ये एकूण १७ गाळेधारक असून त्यापैकी १३ गाळे तळमजल्यावर, ३ गाळे पहिल्या मजल्यावर तसेच १ पत्राशेड आहे. याशिवाय ३६ खोकेधारक नगरपंचायतीकडे नोंदणीकृत आहेत. महसूल विभागाच्या जागेवरील ११ खोकेधारकांसह अनेक व्यापारी गेली १० ते १५ वर्षे येथे व्यवसाय करीत आहेत. सर्व व्यापारी नियमितपणे भाडे भरत असल्याने नवीन व्यापारी संकुल उभारणी करताना त्यांचाही विचार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यात आली होती. लवकरच सर्व व्यापाऱ्यांसह पालकमंत्र्यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या प्रसंगी मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. बैठकीला अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिलभाई कुरेशी, प्रभाकर कदम, सौ. ऋणाली राजेंद्र पेडणेकर, भगवान कासले, राम सूर्यवंशी, महेश वायगंणकर, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर, भारती फाटक यांच्यासह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.
