You are currently viewing मोती तलाव परिसरातील फुटपाथ कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामाबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा आरोप

मोती तलाव परिसरातील फुटपाथ कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामाबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा आरोप

मोती तलाव परिसरातील फुटपाथ कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामाबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा आरोप

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या फुटपाथच्या कामामध्ये दर्जाहीन कामकाज होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. शहरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मोती तलाव परिसरात नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असून नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली.
सुर्याजी यांच्या म्हणण्यानुसार, सेल्फी पॉईंटसमोरील भागात आवश्यक ते काँक्रीटीकरण न करता थेट पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. तसेच संस्थानकालीन मोती तलावाशी जोडलेल्या जुन्या जलनिस्सारण व्यवस्थेतील सिमेंटचे पाइप ठेकेदाराकडून फोडण्यात आले असून त्यावर अत्यंत पातळ आणि निकृष्ट दर्जाच्या फरशा बसविण्याचे काम सुरू आहे.
या परिसरातील मोऱ्या आणि पाइप व्यवस्था ही पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्यासाठी पूर्वीच्या काळात उभारण्यात आली होती. मात्र, विद्यमान कामादरम्यान ही व्यवस्था बाधित झाल्याने भविष्यात पावसाळ्यात पाणी साचण्याची तसेच कचरा अडकून जलनिस्सारण यंत्रणा तुंबण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
फुटपाथ हा दीर्घकाळ टिकणारा सार्वजनिक प्रकल्प असल्याने कामाची गुणवत्ता आणि तांत्रिक नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र सध्या वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचा दावा त्यांनी केला. फरशांवर काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉकचा भार आल्यास त्या तुटण्याची शक्यता असून भविष्यात दुरुस्तीसाठी पुन्हा फुटपाथ उखडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
याबाबत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत सुर्याजी यांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला. संबंधित कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून त्रुटी दूर कराव्यात आणि कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा