चौकेकरवाडीतील धोकादायक वळणावर तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी
न्हावेली-रेडी महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणाची पाहणी करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश
सावंतवाडी
तालुक्यातील न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकेकरवाडी येथे तातडीने संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली.
सध्या या धोकादायक ठिकाणी केवळ पत्र्याचे बॅरेल्स उभे करून ठेवण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना महामार्गाचा अंदाज येत नसून वारंवार अपघात घडत असल्याची बाब पार्सेकर यांनी निदर्शनास आणून दिली. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी थेट मुख्य कार्यालयात धाव घेत आजच्या आज नियोजन करण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत कार्यकारी अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केली. रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बांदा-शेर्ले-डोनकल मार्गावरील कापईवाडी पुलावरील अर्धवट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच निगुडे-सोनुर्ली महामार्गावर पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
या सर्व मागण्यांची दखल घेत कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी न्हावेली-रेडी महामार्गावरील संरक्षक भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्याचे आदेश उपअभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता विजय लोहार यांना दिले. तसेच आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
याबाबत माहिती देताना उपअभियंता अजित पाटील यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणचा ब्रिज मंजूर झाला असून त्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा वेगाने सुरू आहे.
या बैठकीस सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्यासह ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, श्रेयश गावडे, सौरभ पार्सेकर, दीपक पार्सेकर, अनिकेत धवण, रोहित निर्गुण, आकाश निर्गुण तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
