शिरोड्यात भाजप महिला मोर्चाकडून ‘जिहाद का आणि किती?’ पुस्तकाचे मोफत वितरण
मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू युवतींमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने घरोघरी जाऊन राबविला उपक्रम
वेंगुर्ले :
भारतात लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद तसेच हिंदू धर्मातील युवतींवर होणाऱ्या कथित अत्याचारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष शिरोडा महिला मोर्चाच्या वतीने सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित “जिहाद का आणि किती?” या पुस्तकाच्या मोफत वितरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत भाजप शिरोडा महिला मोर्चाच्या सदस्या तथा शिरोडा ग्रामपंचायत सदस्या सौ. हेतल गावडे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी सौ. गंधाली करमळकर व सौ. स्नेहा गोडकर तसेच ग्रामपंचायत सदस्या रेखा नाईक व अर्चना नाईक यांनी घरोघरी जाऊन हिंदू युवतींना पुस्तकाचे मोफत वितरण केले.
यावेळी भाजप वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, शिरोडा शहराध्यक्ष अमित गावडे, युवा मोर्चा सदस्य सोमाकांत सावंत, बूथ क्र. ८५ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर नार्वेकर, भाजप पदाधिकारी नितीन तारी, युवा नेते संतोष धानजी तसेच केरवाडा ग्रामस्थ किरण मसुरकर आदी उपस्थित होते.
