म्हापण येथे ७ ऑगस्टला मान्सून महोत्सव; ‘हीच ती इंद्रायणी’ दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार
उत्साही मित्रमंडळाचे आयोजन; दशावतारातील दिग्गज कलाकारांचा सहभाग, रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कुडाळ :
म्हापण येथील उत्साही मित्रमंडळाच्या वतीने तसेच वांद्रे-मुंबई शिवसेना (शिंदे) विभागप्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर यांच्या पुरस्कृत सहकार्याने श्री देवी सातेरी मंदिर येथे गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता दशावतारातील दिग्गज कलाकारांच्या संयुक्त संचाकडून ‘हीच ती इंद्रायणी’ या बहुचर्चित नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
या नाटकात इंद्रच्या भूमिकेत गौरव शिर्के, वरुणदेव – सागर गावकर, नारद – चारुहास मांजरेकर, वायुदेव – नारायण आसयेकर, रंभा – गोट्या येरागी, गरुड – मोरेश्वर सावंत, माळी – उपरिचर वसू, संदेश वेंगुर्लेकर, मच्छिंद्रनाथ – बाबा मयेकर, सची – सुधीर तांडेल, नंदी – उदय मोर्ये, चरपटीनाथ – दत्तप्रसाद शेणई, तर बालकलाकार करण जळवी मीनानाथची भूमिका साकारणार आहेत.
नाटकाला हार्मोनियमवर मयूर गवळी, पखवाजवर किसन नेमळेकर आणि झांजवादनासाठी विनायक सावंत यांची संगीतसाथ लाभणार आहे. नाटकाची कथा व संकल्पना विश्राम (बाळा) राऊळ (खवणे) यांची असून अमृतनाथ दशावतार मंडळ, म्हापण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या मान्सून महोत्सवाचा आणि दशावतारी नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्साही मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ (नाथा) मडवळ व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
