You are currently viewing शिरोड्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरोड्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरोड्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बाजारपेठ, बसस्थानक, शाळा परिसरात वावर वाढला; निर्बीजीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी

वेंगुर्ले : 

शिरोडा परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शिरोडा बाजारपेठ, बायपास रोड, मच्छी मार्केट, भाजी मार्केट आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा कुत्र्यांचे कळप पादचारी व दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याशिवाय रहिवासी संकुलांच्या परिसरातही भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी सतत भुंकण्याचा त्रास होत असून रहिवाशांच्या झोपेवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याऐवजी त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रित करणे अपेक्षित आहे. मात्र शिरोडा परिसरात अशा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चाने निर्बीजीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याला अपेक्षित यश मिळाले नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

भाजी मार्केट, मच्छी मार्केट, बसस्थानक तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि हायस्कूल परिसरातही भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका लक्षात घेता शिरोडा ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाने तातडीने निर्बीजीकरण मोहीम राबवून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा