You are currently viewing सायंप्रहर

सायंप्रहर

 

पावसाळ्यातील एखाद्या दुपारी आभाळ गच्च भरून आलेलं असतं, तासा-दोन तासानंतर मात्र ते स्वच्छ झालेलं पहायला मिळतं. सूर्यदेवाचे पुनश्च डोकावणे सुरू झालेले असते. गवताच्या पात्यांवर सूर्यकिरणांचे विसावणे आणि त्यांना प्राप्त झालेला हळदी रंग डोळ्यांमध्ये सामावत नसतो. दिवसाची वाटचाल हळूहळू संध्याकाळकडे होत चाललेली असते. कातरवेळीची चाहूल, त्यानंतरची दिवेलागणीची वेळ, नभांगणातील तारकांचे मन:पटलावर प्रकटणे सर्व काही आपापले वैशिष्ट्ये जपत रहाते. कातरवेळ या प्रहराचा नेहमी असाच उल्लेख होतो, मनांला हुरहुर लावणारी, काही ना काही आठवणी जागवणारी अशी ही वेळ, उजेड मंदावत असताना अस्वस्थ मनीची उलथापालथ शांत करण्याचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने समईत तेवणाऱ्या सांजवातीत असते.

ग्रामीण भागांत संध्याकाळी साधारण सात ते साडेसातच्या दरम्यान, ग्रामदैवतेची आरती होते, असे पहायला मिळते. खरे तर दिवसांतल्या प्रत्येक प्रहराचे महत्व वेगळेच आहे, परंतु सूर्यास्ताची वेळ म्हणजे, दिवसभर तळपणाऱ्या आणि आता लालबूंद झालेल्या त्या सूर्यबिंबाला निरोप देताना मन कधी कधी अशांत होत असते. कामकाजाची वेळ संपवून घरट्याकडे धाव घेणारे नागरिक, तसेच पक्षांचे थवेच्या थवे आकाशांत दिसत रहातांत. रात्र व्हायच्या आत घरट्यांचा शोध घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. दिवसभरांत केलेल्या कामांचा तसेच घडलेल्या घटनांचा आढावा घेण्याची ही वेळ म्हणजेच संध्याकाळ, कुणी घराच्या गच्चीवर जाणे पसंत करतात, संध्याकाळी फिरायला जाणे हा काही जणांचा नियम असतो. शहरांतील गांवभाग व गल्ल्या गजबजून जातात.

दुपारपासून लाभलेल्या शांतवेळी घरांतील वृद्ध व्यक्तींची धान्य निवड-टिपणीची कामे, पूर्वीच्या काळी चालू असायची. दिवेलागण होताच स्वयंपाकाची लगबग सुरू असायची, आता फक्त धावपळ असते. एखाद्या दिवशी बाहेर सहलीसाठी गेलो की परतीच्या प्रवासांत हा सुंदर सायंप्रहर अनुभवता येतो. मावळत्या भानूदेवाला निरोप देताना एकीकडे उर्जामक दिन पूर्ण झालेला असतो, तर दुसरीकडे उगवती चंद्रकोर किंवा पूर्ण चंद्र शांतता घेऊन येतात. अशा वेळी निसर्गाच्या या घटनाक्रमांतून अर्थातच उर्जा आणि शांतता याचे महत्व पटत रहाते. काही पिढ्यांआधी सायंप्रहर होताच घराचा मागचा दरवाजा बंद केला जायचा, सायंस्तोत्रे घरांघरांतून ऐकू यायची. आजच्या काळांत सुखाचा शोध घेत असलेल्या मनुष्याचा सायंप्रहर असा असतो, भिंतीवर दिमाखात विराजमान असलेल्या मोठ्या टेलिव्हिजनचा घुमणारा आवाज, अखंड सुरू असलेले कार्यक्रम आणि गोंगाट. पण काही ठिकाणी हेही चित्र असते,

“वैचारिक मंथन दैनंदिनी संगणकाच्या विश्वांत, सरे दिन होई रजनी कर्तुत्वाच्या समर्पणांत”

 

© मेघनुश्री [लेखिका, पत्रकार]

भ्रमणध्वनी ; ९८३४८२४०१६

प्रतिक्रिया व्यक्त करा