You are currently viewing पिंपरी – चिंचवडमध्ये ‘शाश्वत स्वर’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – चिंचवडमध्ये ‘शाश्वत स्वर’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – चिंचवडमध्ये ‘शाश्वत स्वर’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*मसाप चा साहित्य – सांगीतिक उपक्रम*

पिंपरी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड आणि ‘स्वर प्रतिभा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत स्वर’ (गाणाऱ्या कविता) हा साहित्य – सांगीतिक कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील कवयित्री शांता शेळके सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. संत चोखामेळा व संत तुकाराम यांच्या अभंगांपासून ते गदिमा, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर, पी. सावळाराम आणि कृ. प्र. खाडिलकर अशा अनेक प्रतिभावंत कवींच्या अजरामर रचनांनी या कार्यक्रमात शब्दांची आणि सुरांची अनोखी मेजवानी रसिकांना दिली. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित कंठसंगीत रत्न पुरस्कार प्राप्त पं. कल्याण गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, स्नेहसावली वृद्धाश्रमाचे संस्थापक डॉ. अविनाश वैद्य, शरद क्रीडा प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे, उद्योजक महादेव कवितके आणि सामाजिक कार्य प्रणेते विवेकानंद सुतार हे मान्यवर उपस्थित होते. या सांगीतिक महोत्सवात गायक अविनाश लेले आणि गायिका अरुणा देवगावकर यांनी आपल्या मधुर आणि बहारदार गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यांना ‘रहे ना रहे हम’ तसेच ‘रुपेरी वाळूत माळ्याच्या वनात’ ही दोन गाणी गाऊन गायिका रिचा राजन यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमात ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘माझे जीवन गाणे’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ आणि ‘गा कोकिळा गा’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी सभागृह दुमदुमून गेले. आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि इतर दिग्गज गायकांच्या कंठातून अजरामर झालेल्या या रचना ऐकताना रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

या सुरेल प्रवासाला देवदत्त साने यांनी हार्मोनियमवर, विष्णू कुलकर्णी यांनी तबल्यावर, तर सलिल देवगावकर यांनी तालवाद्यावर अप्रतिम साथसंगत करत गाण्यांची रंगत अधिकच वाढवली. राजन लाखे यांनी प्रास्ताविक करून या सांगीतिक आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यवाह संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. किशोर पाटील, किरण लाखे, जयश्री श्रीखंडे, किरण जोशी, नागेश गव्हाड, गीता सुतार, डॉ. मीनल लाड, कोमल पाटील यांनी संयोजन केले. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा