सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फुटलेली मंगलोरी कौले बदलली; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण
माकडांच्या उपद्रवामुळे झालेले नुकसान दूर; रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाची तातडीने कार्यवाही
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवरील मंगलोरी कौले माकडांच्या उपद्रवामुळे काही प्रमाणात फुटली होती. यामुळे आगामी पावसाळ्यात रुग्णांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कार्यवाही केली.
रुग्णालयातील प्रसूती विभागासह विविध भागांमधील मंगलोरी कौलांचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी फुटलेली व खराब झालेली कौले बदलण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तसेच प्रभारी परिचारिका (इन्चार्ज सिस्टर) यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांना रीतसर पत्र देऊन आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनीही या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधून रुग्णांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली होती.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून खासगी कंत्राटदारामार्फत आवश्यक काम हाती घेण्यात आले. शुक्रवारी संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवून फुटलेली मंगलोरी कौले बदलण्यात आली व रुग्णालयाची समस्या दूर करण्यात आली.
रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुरुस्ती वेळेत पूर्ण झाल्याने रुग्णालय प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती राजू मसूरकर यांनी दिली.
