You are currently viewing देवगड, रत्नागिरी हापूस नाव वापरून दुय्यम हापुस सदृश्य आंबा विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाई करावी.

देवगड, रत्नागिरी हापूस नाव वापरून दुय्यम हापुस सदृश्य आंबा विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी.*

वैभववाडी

दि.२१ मार्च, २०२१

आता बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य इतर दुय्यम प्रतीचा आंबा घालून इतर राज्यातील आंब्याची विक्री केली जाते. म्हणजेच पिवळे पितळ सोने म्हणून विक्री केली जाते. हापूस सदृश्य आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यातून नेहमीच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यास फायदा होत नाही. तसेच चोखंदळ ग्राहकांची फसवणूक होते हे टाळणे गरजेचे आहे अशी मागणे ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे करण्यात आली आहे.

संदर्भ क्रमांक- १) वस्तूच्या भौगोलिक निर्देशन (नोंदणी व संरक्षण) कायदा १९९९.

२)भौगोलिक निर्देशन संस्था क्रमांक १३९ व प्रमाणपत्र क्रमांक ३२४.

त्यासाठी आपणाकडून  कर्तव्यात्मक  प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. ती म्हणजे वरील संदर्भ क्रमांक एकच्या कायद्याचे वाचन व्हावे व त्या कायद्यानुसार वरील संदर्भ क्रमांक दोनद्वारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर याच जिल्ह्यामधील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना “हापूस आंबा” हा शब्द वापरून त्यांचा आंबा विक्री करण्याचा अधिकार वरील संदर्भ क्रमांक एकद्वारे प्राप्त झालेला आहे. इतरत्र आंबा उत्पादक व व्यापाऱ्यांनी देवगड, रत्नागिरी हापूस असे उल्लेखलेले बॉक्स सरसकट वापरून दुय्यम आंबा विक्री करणे हे कायदा व नियम मोडणारी कृती आहे.

तरी शेतकरी व ग्राहक हितार्थ आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने पुढील मागणी करीत आहोत.

१) वरील उल्लेखित पाच जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर येथील आंबा उत्पादकांची लेखी मागणी असल्याशिवाय देवगड, रत्नागिरी हापूस नावाचा उल्लेख करून आगाऊ बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्यांची, व्यापारी यांची पाहणी, तपासणी करून वरील संदर्भ क्रमांक एक नुसार कारवाई पूर्वसूचना-समज-नोटीस द्यावी व कारवाई करावी.

२)घाऊक- किरकोळ फळ विक्रेते तसेच उत्पादित माल विक्री करणाऱ्यांची पण पहाणी-तपासणी करून संदर्भ क्रमांक दोननुसार कारवाई पूर्वसूचना- समज-नोटीस द्यावी व कारवाई करावी.

३)हापूस नाव व्यवसायासाठी वापरणे पूर्वी संदर्भ क्रमांक एक नुसार योग्य अयोग्य की कायदेशीर माहिती संबंधितांकडून घेतली जावी. यासाठी आपल्या स्तरावरून प्रबोधन करून त्या पश्चात आठ दिवसांनी कारवाई पूर्वसूचना- समज- नोटीस द्यावी व कारवाई करावी अशी विनंती ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. सदर पत्राच्या प्रत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग,  मा.कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, मा. सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन सिंधुदुर्ग, मा.अधीक्षक, कृषी विभाग सिंधुदुर्ग व मा.उपनिबंधक, सहकारी संस्था यांना मेलद्वारे पाठविण्‍यात आली आहे.

वरील बाबत अत्यंत तातडीने म्हणजे सदरचे पत्र मिळाल्यापासून आठ दिवसात आपले कार्यालयाचे स्तरावरून सरकारी वकिलांचा सल्ला घेऊन कामकाज सुरू व्हावे. दिरंगाई झाल्यास हापूस आंबा उत्पादक शेतक-याचे नुकसान व ग्राहक फसवणूक यास आपले कार्यालय जबाबदार असेल. तसेच हे या कार्यालयाचे काम नाही असे टाळाटाळ करू नये, हीच अपेक्षा. सबब पंधरा दिवसात कृती करून पत्रोत्तर व्हावे अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य

प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − one =