सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सुविधेचा २५ हजारांहून अधिक रुग्णांना लाभ
रवींद्र चव्हाण व राजेंद्र मसुरकर यांच्या प्रयत्नांना यश; गोरगरीब रुग्णांचे कोट्यवधी रुपये वाचल्याचा दावा
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिटीस्कॅन सुविधेचा आतापर्यंत २५ हजारांहून अधिक रुग्णांनी मोफत लाभ घेतला असून त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाल्याचा दावा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केला आहे.
माजी मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने आणि जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यामुळे सावंतवाडी तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करण्यात आल्याचे मसुरकर यांनी सांगितले. यापूर्वी सिटीस्कॅनसाठी रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, शासनाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅनचा लाभ मिळत आहे, तर कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील रुग्ण कणकवली येथील सुविधेचा लाभ घेत आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील सुविधा कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील रुग्णांसाठी उपलब्ध आहे.
राजेंद्र मसुरकर यांनी सांगितले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळतात. मात्र, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सिटीस्कॅन तपासणीचा खर्च अनेकांना परवडत नव्हता. ही बाब तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पाठपुरावा करून या मशिन मंजूर करण्यास मदत केली.
दरम्यान, नुकतीच तळवडे येथे रवींद्र चव्हाण यांचे नातेवाईक गणपत परब, प्रमोद परब तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राजेंद्र मसुरकर यांनी गोरगरीब रुग्णांच्या वतीने आभार व्यक्त केले. सिटीस्कॅन सुविधेमुळे हजारो रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळत असल्याने ही सुविधा जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी व कणकवली येथील सिटीस्कॅन सुविधेचा लाभ भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात रुग्णांना मिळावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
