You are currently viewing प्रस्ताव द्या; मी भारतरत्नसाठी प्रयत्न करतो
Oplus_16908288

प्रस्ताव द्या; मी भारतरत्नसाठी प्रयत्न करतो

डॉ.पंजाबराव देशमुखांसाठी; मा.श्री नितीन गडकरी यांचा पुढाकार

अमरावती :

तुम्ही मला प्रस्ताव द्या. मी शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी हृदयापासून प्रयत्न करतो हे उद्गार आहेत लोकप्रिय समाजाभिमुख केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांचे.

त्याचे असे झाले की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्यासाठी पुस्तकांच्या रूपांने नाटकाच्या रूपाने आयएएस अकादमीच्या रूपाने लोकमहर्षी या काव्य गायनाच्या रूपाने सातत्याने तीस वर्षापासून प्रयत्न करीत आहोत.

दिल्लीचे माझे मित्र व सुप्रीम कोर्टाचे सिनियर एड. श्री के. के. चौधरी हे अमरावतीला माझ्याकडे मित्र म्हणून आले. मी ज्यांना डॉ पंजाबराव देशमुखांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भेट देण्याची व्यवस्था केली. ते सर्व पाहून ते म्हणाले डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न साठी तुम्ही का प्रयत्न करीत नाही. मी त्यांना म्हटले आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने तसा प्रस्ताव दाखल केलेला आहे. ते मला म्हणाले नितीनजी से मिले क्या. मला नवल वाटले. हा माणूस पंतप्रधानांना भेटा मुख्यमंत्र्यांना भेटा राष्ट्रपतींना भेटा असे म्हणत नाही आणि म्हणतो की नितीन गडकरींना भेटा. पण माणूस फार मोठा होता.

विचारपूर्वक बोलणार होता. मी काही बोलण्यापूर्वीच ते म्हणाले. यह काम नितीनजी ही कर सकते है. नितीनजीबद्दल किती प्रचंड विश्वास त्यांना होता. ते म्हणाले.चलो नितीनजीसे मिलते है.

मी लगेच माझे मित्र व नितीन गडकरी साहेबांचे अधिकारी श्री मनोज वाडेकर यांना फोन लावला. ते मला म्हणाले मी पुण्याला आहे. साहेबांबरोबर नाही. दुसरे सहकारी आहेत. त्यांचा मी नंबर देतो .तुम्ही त्यांना फोन करा. मनोज वाडेकर यांनी ताबडतोब नंबर दिला. मी फोन लावला. कामाचे स्वरूप सांगितले. तिकडून प्रतिसाद आला. तुम्ही ताबडतोब नागपूरला या. साहेबांची तुमची भेट करून देतो.

आम्ही जिथे होतो तिथेच आम्ही आमची गाडी नागपूरकडे वळविली. नागपूरला पोहोचलो. वाटेत चहाला देखील थांबलो नाही. गडकरी साहेबांची भेट महत्त्वाची होती.गडकरी साहेबांच्या दरबारात दाखल झालो. प्रचंड गर्दी होती. साहेब म्हणजे भेटणाऱ्यांसाठी देव माणूस. प्रत्येकाला भेटत होते. आमचा नंबर केव्हा लागेल याचा थांगपत्ता नव्हता. आम्ही त्यांच्यापासून खूप दूर उभे होतो. तेवढ्यात गडकरी साहेबांची नजर आमच्याकडे वळली . त्यांनी आम्हाला हाताने इशारा केला आणि जवळ बोलाविले. कदाचित सीनियर सिटीजन असल्याचा तो फायदा असावा किंवा ही माणसे काहीतरी वेगळी आहेत असे गडकरी साहेबांना वाटले असावे. त्यांचा पी.ए. धावतच आमच्याकडे आला आणि म्हणाला साहेब तुम्हाला बोलावित आहेत. आम्ही साहेबां जवळ पोहोचलो. साहेबांनी विचारले काय काम आहे ? आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी आपल्याकडे आलो आहे असे सांगितले. नितीनजी म्हणाले पंजाबराव माझ्या तुमच्याप्रमाणे माझे देखील दैवत आहेत. त्यांना भारतरत्न देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे .तुम्ही फक्त एवढेच करा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा ठराव घेऊन माझ्याकडे या .मग बाकीची सगळी जबाबदारी माझी.

आम्हाला खूपच आनंद झाला. हा माणूस आहे की देव माणूस. एवढ्या गर्दीतून आम्हाला हेरतो .जवळ बोलावितो आणि भारतरत्नसारखे मोठे काम मी स्वतः पुढाकार करून करून घेतो हे म्हणायला धाडस लागते आणि ते निश्चितच नितीन गडकरी यांचे ठिकाणी आहे.

मी नितीनजींना म्हणालो. तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे. माझा मोबाईल मी कोणाला तरी द्यायला लागलो. तर गडकरीसाहेब म्हणाले. माझा फोटोग्राफर काढेल आणि तुमचा नंबर द्या. तुमच्या नंबर वर तो फोटो पाठवेल .फोटो झाले .नितीनजी आमचा निरोप घेताना म्हणाले प्रस्ताव ताबडतोब आला की बाकी माझ्याकडे लागले.

आम्ही खाली येईपर्यंत आमच्या मोबाईलवर साहेबांबरोबरचे आमचे फोटो आले होते .

एक काम झाले. पण त्यासाठी जनजागृती करणे. प्रस्ताव दाखल करणे. हे करायचे होते. मी लगेच मराठा सेवा संघाचे संस्थापक व आमचे मार्गदर्शक एड.पुरुषोत्तम खेडेकरांना फोन लावला. त्यांना वृत्तांत सांगितला. ते म्हणाले अमरावतीला ताबडतोब एक सभा आयोजित करा. मी जिथे असेल तिथून येतो.

आमची गाडी अमरावतीकडे वळत होती आणि माझे नियोजन अमरावतीच्या सभे च्या नियोजनाकडे वळले होते. चौधरी साहेबांचे म्हणणे पडले की जास्त लोकांना बोलावू नका. मोजक्या लोकांना बोलवा. त्यांच्या समवेत चर्चा करू .प्रस्ताव तयार करू आणि पाठपुरावा करू.

सभेसाठी मी प्रा. हरिहर लुंगे प्रा. अलका गायकवाड प्रा. मनीष गायकवाड व वैशाली गायकवाड या माझ्या सहकारी सहकाऱ्यांना फोन केले. सुरुवातीची मीटिंग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोडवरील जिजाऊ नगरातील महापौरांच्या बंगल्यासमोरील त्यांच्याकडे घेण्याचे ठरविले. अलका गायकवाड यांनी मिटिंगची सगळी जबाबदारी स्वीकारली .खेडेकर साहेबांना फोन केला . ते म्हणाले मी अमरावतीपासून तीन तासाच्या अंतरावर आहे पण मी लगेच निघतो आणि वेळेवर पोहोचतो.

आम्ही अमरावतीला पोहोचेपर्यंत सभेची तयारी झाली होती .ते सगळं श्रेय गायकवाड आणि लुंगे परिवाराला जाते. खेडेकर साहेब प्रवासातच होते .पण ते देखील गडकरीसाहेबांसारखेच तत्पर तेजस्वी व तपस्वी व्यक्तिमत्व .त्यांनी आपली चिखलीला जाणारी गाडी फिरविली आणि अमरावतीच्या दिशेने ते निघाले .त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अमरावतीला तयार राहिलो साहेब आले . सोबत सौ रेखा वहिनी देखील होत्या.चौधरी साहेबांनी व खेडेकर साहेबांनी चर्चा केली. त्यांच्यासमोर आम्ही लहान माणसं .ते बोलत होते. आम्ही ऐकत होतो .खेडेकर साहेब म्हणाले. काठोळे तुम्ही खूप चांगले काम केलं. नितीनजी भेट घेतली .आता पाठपुरावा करा. माझी व मराठा सेवा संघाची जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. मी त्यांना म्हटले आपण आणि मराठा सेवा संघ आमच्या पाठीशी उभा आहात तर मग आम्हाला कुठलीच कमतरता भासणार नाही .

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांना फोन लावला. ते म्हणाले मी जरूडला आहे.आम्ही जरूड गाठले. त्यांनी होकार दिला .ते म्हणाले विजय ठाकरेंना भेटा .आपला प्रस्ताव तयार आहे .

दुसऱ्या दिवशी आम्ही अमरावतीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यालय गाठले. श्री विजय ठाकरे यांना भेटलो .त्यांना भैय्यासाहेबांचा निरोप सांगितला . ते म्हणाले . भैय्यासाहेबांचा मला फोन आलेला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावे यासाठी संस्थेने यापूर्वी दाखल प्रस्ताव दाखल केलेला आहे .आम्ही तो शोधतो आणि आपण पाठपुरावा करू. पुढच्या कामासाठी श्री दादासाहेब काळमेघ यांचे सुपुत्र व खऱ्या अर्थाने झुंजार व्यक्तिमत्व श्री हेमंत काळमेघ मदतीला आले .ते म्हणाले काठोळे काका तुम्ही काळजी नका करू. प्रस्ताव नितीनजीकडे पोहोचण्याची जबाबदारी माझी. हेमंत काळमेघ यांनी हे शिव धनुष्य पेलण्याचे स्वीकारल्यानंतर आम्ही निश्चिंत झालो.

दिल्लीहून आलेले एड. के.के. चौधरी म्हणाले काठोळेजी ठराव प्रस्ताव ठीक है.लेकिन जनजागृती करना पडेगा .लगेच आम्ही पंजाबरावांना भारतरत्न मिळावे ह्या सह्याच्या मोहिमेला सुरुवात केली. पहिली सही घेतली ती डॉ. पंजाबराव देशमुख यांची पुतणी असलेल्या श्रीमती रजनी देशमुख यांची. त्या अमरावतीलाच राहतात. पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वस्तीगृह भागात प्राचार्य अनुप्रिया देशमुख यांचे घर आम्ही गाठले. रजनीताई चालत्या बोलत्या आहेत. वय 85 च्या वर आहे. पण पंजाबराव म्हटले की त्यांना गहिवरून येते .त्यांनी सही केली. अनुप्रिताताई आणि त्यांचे यजमान यांनी माझ्याकडून सह्यांचे प्रोफाइल मागून घेतले. ते म्हणाले आम्ही आमच्या पापळ गावच्या सगळ्या सह्या तुम्हाला आणून देतो .आम्ही कामाला लागलो.

केंद्र शासनामध्ये आता डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावे यासाठी प्रस्ताव दाखल झालेला आहे. या कामी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार महत्त्वाचा आहे आणि नितीन गडकरींनी ते शिवधनुष्य पेलण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे .तो दिवस दूर नाही ज्या दिवशी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न जाहीर झालेला असेल. पण याचे श्रेय मात्र द्यावे लागेल ते श्री नितीनजी गडकरी यांनाच.

जितनेवाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंग से करते है.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा