You are currently viewing सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था कोलमडली
Oplus_16908288

सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था कोलमडली

पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या बदलीची मागणी : आमदार निलेश राणे

गुन्हेगारी, अवैध दारू, अमली पदार्थ, गो-तस्करी आणि पोलिसांवरील गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांचेच अभय मिळत असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा गंभीर आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर घणाघाती टीका केली. डॉ. दहिकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सिंधुदुर्गनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर आणि जिल्हा बँक संचालक संदीप परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राणे म्हणाले की, डॉ. मोहन दहिकर यांनी २२ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. सध्या जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची बाब चिंताजनक आहे.

गोवा बनावटीच्या अवैध दारू तस्करीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोव्यातून मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात अवैध दारू आणली जाते, मात्र या वाहतुकीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे पकडली जाणारी बहुतांश अवैध दारू रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात जप्त होत असल्याचे सांगत, सिंधुदुर्गच्या हद्दीत मोठ्या कारवाया होत नसल्याचा दावा त्यांनी केला.

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना राणे यांनी पोलिस तपासावरही प्रश्न उपस्थित केले. पोलिस केवळ किरकोळ आरोपींना पकडून कारवाईचे श्रेय घेतात; मात्र ड्रग्ज आणि गांजा पुरवठ्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आरोपी सहज जामिनावर सुटून पुन्हा सक्रिय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दोडामार्ग तालुक्याबाबतही त्यांनी गंभीर आरोप केला. रबर शेतीच्या नावाखाली काही ठिकाणी गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याचा संशय व्यक्त करत या भागात विशेष शोध मोहीम राबविण्याची मागणी त्यांनी केली. सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र रबर लागवडीखाली असून तेथे सर्वसामान्यांना सहज प्रवेश दिला जात नसल्याने संशय अधिक बळावल्याचे त्यांनी सांगितले.

गो-तस्करीच्या मुद्यावर बोलताना जिल्ह्यात बेकायदा गोमांस विक्री आणि गो-तस्करी राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत माहिती असूनही पोलिस ठोस कारवाई करत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वाजणाऱ्या ध्वनिक्षेपकांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असूनही पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेच्या शेवटी आमदार निलेश राणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडून कथित हप्ते गोळा करण्याचे काम काही पोलिस अधिकारी करत असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस प्रशासनातील कथित भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे अभय यामुळे जिल्ह्याची शांतता धोक्यात आली असून यासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

या सर्व गंभीर बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून डॉ. मोहन दहिकर यांच्या बदलीची मागणी लावून धरली जाईल, असा इशाराही आमदार निलेश राणे यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा