You are currently viewing सावंतवाडीत वारंवार वीज खंडित; संतप्त नगरसेवकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सावंतवाडीत वारंवार वीज खंडित; संतप्त नगरसेवकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सावंतवाडीत वारंवार वीज खंडित; संतप्त नगरसेवकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

“पावसाच्या तोंडावरच कामे आठवतात का?” ; बबन साळगावकर यांचा महावितरणला सज्जड दम

सावंतवाडी

पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून सुरू असलेल्या संथ आणि विस्कळीत कामांमुळे सावंतवाडी शहरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. शहरात दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला असून, या गंभीर समस्येची दखल घेत आज सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरले.
“पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच तुम्हाला कामे आठवतात का?, इतके दिवस नेमके काय सुरू होते?” अशा तिखट शब्दांत लोकप्रतिनिधींनी महावितरण प्रशासनाचा समाचार घेतला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, विलास जाधव, दिलीप भालेकर, नागेश जगताप, कृणाल शृंगारे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात सध्या वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि गृहिणींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर स्पष्टीकरण देताना महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहराला दोन फिडरवरून वीज पुरवठा केला जातो. दोन्ही फिडर एकाच वेळी सुरू राहत असल्याने एका भागात काम करताना सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद करावा लागतो. मात्र अधिकाऱ्यांच्या या उत्तराने लोकप्रतिनिधींमध्ये अधिकच संताप उसळला.
नगरसेवक आनंद नेवगी यांनी शहरातील जीर्ण विद्युत खांब आणि धोकादायक वीज वाहिन्यांचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. यापूर्वी वीज वाहिनी अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता, तरीही महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पुन्हा एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहात का?, असा सवाल त्यांनी केला.
नगरसेविका सुकन्या टोपले यांनी मिलाग्रीस हायस्कूलसमोरील जीर्ण खांब थेट गटारात कोसळल्याने एका विद्यार्थिनीला दुखापत झाल्याची गंभीर घटना उघड करत संबंधित धोकादायक खांब तात्काळ हटवण्याची मागणी केली.
भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनीही महावितरणच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत पालिकेत दोन वेळा विशेष बैठक घेऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “जनतेला वेठीस धरून दुरुस्तीची कामे सुरू आहेत, मग दिवसभर कार्यालयात बसून अधिकारी नेमके काय करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर उपअभियंता शैलेश राक्षे यांनी कामांसाठी खाजगी कामगार उपलब्ध नसल्याने आणि कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. मात्र उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, या उत्तराने समाधान न झालेल्या लोकप्रतिनिधींनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची मागणी केली. त्यानंतर अभियंता राक्षे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, “आम्ही सत्तेत असलो तरी नागरिकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा सज्जड इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी महावितरण प्रशासनाला दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा