मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मदतीची मागणी
आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याबाबत सकारात्मक चर्चा; विमा कंपन्यांची बैठक घेण्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली :
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाधित बागायतदारांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कोकणातील आंबा बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच केंद्र सरकारकडून आर्थिक दिलासा देण्यात यावा, अशी भूमिका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मांडली. यावेळी कोकणातील आंबा उत्पादनावर अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे झालेल्या परिणामांची सविस्तर माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांना देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने आंबा विमा योजनांमध्ये विमा कंपन्यांकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या अटींमध्ये आवश्यक बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
