You are currently viewing नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कुडाळ आयोजित दिवाळी भव्य खरेदी महोत्सवाचे उद्घाटन

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कुडाळ आयोजित दिवाळी भव्य खरेदी महोत्सवाचे उद्घाटन

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल:- जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

कुडाळ
कोकणातील महिला आत्मनिर्भर असून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांना रोजगार संधी मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहचविणे आवश्यक असून त्यातूनच आजच्या महिला आत्मनिर्भर बनतील. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कुडाळ येथे केले.


नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कुडाळच्या वतीने मी आत्मनिर्भर अंतर्गत येथील महालक्ष्मी हाॅल येथे दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील बचतगट, महिला उद्योजिका व व्यावसायिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व मार्गदर्शन असा तीन दिवशीय कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, सभापती सौ.नुतन आईर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक परशुराम गावडे, एमसीइडीचे विभागीय अध्यक्ष रामचंद्र गावडे, बॅक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक मुकुंद कांबळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे, संस्थेच्या सचिव दिप्ती मोरे तसेच संचालिका, बचतगटाच्या महिला आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. महिला उद्योजिका व बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत. महिलांनी अशा उपक्रमांतून प्रोत्साहन घेऊन उद्योग क्षेत्रात अधिक जोमाने वाटचाल करावी. बचत गट व उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या महिला व युवतीवर्गा पर्यंत पोचल्या पाहीजेत. त्याचा लाभ प्रत्येकाने घेऊन नवनवीन उद्योग, व्यवसाय सुरू करून त्यातून आर्थिक सक्षम बनावे. युवक-युवतींना पालकांनी उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले पाहीजे, असे जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले.
सौ.तेरसे म्हणाल्या, जिल्ह्यातील बचतगट, महिला उद्योजिका व व्यावसायिका यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना चांगले व्यासपीठ मिळावे, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उद्योजिकांचा व्यवसाय अधिकाधिक वृद्धींगत व्हावा, त्यांना व्यवसाय करण्यास अधिक चालना मिळावी, त्यांची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात भविष्यात आणखी महिला उद्योजिका तयार व्हाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी महिला उद्योजिकांसाठी असलेल्या शासनाच्या तसेच बँकांच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. यासाठी बॅकांचे माहीतीपर स्टाॅल्स लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात 40 स्टाॅल्स लावण्यात आले असून दिवाळीसाठी लागणा-या सर्व वस्तू व साहित्याची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. तसेच महिलांना उद्योग विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा