You are currently viewing राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे मुखपत्र `कर्मचारी टाइम्स’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे मुखपत्र `कर्मचारी टाइम्स’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या आणि राज्यभर कार्यरत असलेल्या सर्व वर्गांतील कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत आहे. त्यांच्याशी संबंधित वृत्त, घडामोडी, कामगिरी, महत्वाची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहचावी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंतही त्या बातम्या पोहचाव्यात, यासाठी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी या कर्मचारी वर्गाचे व्यासपीठ ठरेल, असे `कर्मचारी टाइम्स’ हे वृत्तपत्र सुरु केले आहे. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी २०२३ रोजी सहयाद्री अतिथीगृहातील शानदार सोहळ्यात करण्यात आले.

यावेळी वृत्तपत्राचे संपादक भाऊसाहेब पठाण, दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन रमेश लव्हांडे, संघटनेचे बाबा कदम, विश्वास रणदिवे, नंदकुमार साने, पराग आडिवरेकर, सुधीर कोळवणकर, वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक अशोक शिंदे, गुरुदत्त वाकदेकर तसेच संघटनेचे मुख्य सल्लागार माजी आमदार किरण पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित होत नाही किंवा अपेक्षेप्रमाणे त्या दिल्या जात नाही, अशी कर्मचारी वर्गाची तक्रार असते. त्यामुळेच कर्मचारी वर्गाच्या आग्रहास्तव `कर्मचारी टाइम्स’ नावाने हे वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत. `कर्मचारी टाइम्स’चे कार्यालय मंत्रालय समोरील नवीन प्रशासकीय भवनच्या तळमजल्यावर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या शासकीय कर्मचारी वर्गाला त्यांच्याशी संबंधित बातम्या प्रकाशित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, अशा प्रतिक्रिया राज्यातील कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा