You are currently viewing चैत्र

चैत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चैत्र*

 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतुच्या आगमनाची वर्दी मिळते. चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो. नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात. गुलमोहराला अपूर्व रक्तीमा चढतो. पिवळा बहावा फुलतो. पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात. मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत! ना कशाची वाण ना कशाची कमतरता. सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।
आसमंत उष्णतेने भरून जातो. उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात. अनंत आणि मोगऱ्यांचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव. चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते. या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते. दृष्टांचा संहार आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो. या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास! चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच. अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे तसेच शृंगार रसात न्हालेल्या प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात. त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात. मधुप फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात. तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते. कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात. चाफा फुलतो आणि बोल घुमताँँं

” या विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघेजण रे..”
साऱ्यासृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना, कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

सिंगार सिसकता रहा
बिलखता रहा हिया
दुहराता रहा गगन से चातक
पिया पिया …

किंवा,
ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग
काली कोयल गा रही
भान्ती भान्ती के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा, चैतन्याचा संदेश घेऊन येणारा, सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा, धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा