You are currently viewing मोती तलावाचा होणार कायापालट

मोती तलावाचा होणार कायापालट

मोती तलावाचा होणार कायापालट

ऐतिहासिक वारसा जपत सावंतवाडीत उभारणार आधुनिक पर्यटन केंद्र

सावंतवाडी :

येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाचा संपूर्ण कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून हा परिसर पर्यटन आणि सौंदर्यीकरणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला दीपक केसरकर , सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, वास्तुविशारद स्वरदा पोयरेकर, अजय नायक आणि श्रद्धा कदम उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि सावंतवाडी राजघराण्याच्या सदस्यांचे स्वागत करत हा प्रकल्प शासन आणि राजघराण्याच्या संयुक्त प्रयत्नांचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
‘थर्टी स्क्वेअर’ आणि ‘आरजेबी-सीपीएल’ (रतन जे. बटलीबॉय कन्सल्टंट्स प्रा. लि.) यांनी त्यांच्या पर्यावरण भागीदार ‘एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट’ (इडेन एलएलपी) यांच्या सहकार्याने हा सर्वसमावेशक विकास आराखडा सादर केला. ‘लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी’ या तीन प्रमुख तत्त्वांवर हा प्रकल्प आधारित असल्याचे सांगण्यात आले.
या विकास आराखड्यात मोती तलावाच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, पाण्याची स्वच्छता, जलसंवर्धन आणि संरक्षक भिंतींचे मजबुतीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. एकेकाळी शहराचा प्रमुख नैसर्गिक जलसाठा असलेल्या मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व जपत आधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
तसेच स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण जपत पर्यटनाला चालना देण्यासाठी फूड पार्क, नौकाविहार सुविधा, उत्सव प्लाझा, पारंपरिक घाट, तसेच दशावतार नाटक आणि इतर लोककलेसाठी खुल्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. संपूर्ण तलाव परिसर शांत, निसर्गरम्य आणि पारंपरिक घाटांच्या संकल्पनेवर आधारित विकसित केला जाणार आहे.
मोती तलावाच्या प्रस्तावित पुनरुज्जीवनामुळे सावंतवाडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक वारसा, पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचा सुंदर समतोल साधणारा हा प्रकल्प ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा