You are currently viewing वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

नुकतीच बारावीची दिली होती परीक्षा

कणकवली

कणकवली तालुक्यातील वागदे मांगरवाडी येथील महेंद्र केशव घाडीगावकर(१८) या युवकाने हळवल रेल्वे फटका नजीक रुळावर भरधाव मुंबई हॉलिडे स्पेशल या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या शुक्रवारी रात्री ११.५० वाजता केली आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. हळदीच्या कार्यक्रमासाठी महेंद्र गेला आणि तेथूनच थेट रेल्वे ट्रकवर जात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत महेंद्र घाडीगावकर हा घरातून वागदे नमसवाडी येथील एका हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी रात्री गेला होता.रात्री १२.३० वाजता भाऊ रोशन घाडीगावकर भडगाव येथे कामाला जाऊन घरी आल्यानंतर झोपला. सकाळी उठल्यानंतर आई वडील व भावाने पाहिले असता महेंद्र घरी आला नव्हता.त्याची नातेवाईक व शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली.

दरम्यान,तत्पूर्वीच शुक्रवारी रात्री मुंबई हॉलिडे स्पेशल रेल्वे चालकाने कणकवली स्टेशन मास्तर यांना कळवून हळवल रेल्वे फाटका नजीक एका युवकाने उडी मारून आत्महत्या केली आहे असे कळवले. त्यानुसार रेल्वे पोलीस अजय भोई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत कणकवली पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्री तुकडे झालेला मृतदेह ताब्यात घेऊन शीतपेटीत ठेवला होता.घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,रवींद्र बाईत यांनी पंचनामा केला.

दरम्यान महेंद्र यांच्या नातेवाईकांनी सकाळी शोधाशोध सुरू केली. हळवल रेल्वे फाटका नजीक महेंद्र याची मोटरसायकल आढळून आली,तेथून आजूबाजूला शोधाशोध करत असताना त्याची चप्पलही गावातील नागरिकांना दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी काल एक मृतदेह युवकाचा आढळला आहे,तो शीतपेटीत ठेवण्यात आलेला आहे. त्याची अगोदर ओळख पटते का पहा असे कळवले. त्यानुसार सदर युवकाची ओळख पटवून तो महेंद्र घाडीगावकर असल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्या मृतदेहाचे शवविच्छेदन व पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कणकवली पोलिसांनी दिला.   शोकाकुल वातावरणात  ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले.या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.
महिंद्रा घाडीगावकर यांच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा