सरकार व शिवसेना नेहमी पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी

सरकार व शिवसेना नेहमी पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी

येत्या पावसाळी अधिवेशनात एलइडी मासेमारीविरोधात कडक कायदा करण्याची ग्वाही;आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती

मालवण

येत्या पावसाळी अधिवेशनात एलईडी मासेमारीविरोधात कडक कायदा केला जाणार आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी सरकार आणि शिवसेना कायम असून आपले नुकसान करून उपोषण न करता पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती उपोषणकर्त्या मच्छीमारांना केली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गेले सात दिवस पारंपरिक मच्छीमारांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. काल उपोषणकर्त्यांना मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांच्या मागणीनुसार पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र या पत्रावर पारंपरिक मच्छीमार समाधानी नव्हते त्यांनी या पत्रावर काही प्रश्‍न उपस्थित करत याचा खुलासा मत्स्यव्यवसाय विभागाने करावा अशा मागणीचे पत्र दिले. या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी आमदार वैभव नाईक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव, महिला उपस्थित होत्या. यावेळी पारंपरिक मच्छीमारांच्या मागणीनुसार मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुधारीत पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडून केलेल्या पाठपुराव्याची माहितीही मच्छीमारांना देण्यात आली आहे असे आम. नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एलईडी व अवैधरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर कारवाईसाठी आता सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील सातही अधिकार्‍यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याकडून अवैध मासेमारीवर कारवाई केली जाईल. केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या कारवाईच्या विषयाबाबत राज्य शासनाकडून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात आला आहे. राज्याच्या जलधी क्षेत्रात होणार्‍या एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कडक कायदा करण्यात येणार आहे, असेही आम. नाईक म्हणाले. काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्तीनौकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या अनुषंगाने संबंधित सहा ते सात हायस्पीड ट्रॉलर्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या नौका कर्नाटकात जाऊन पकडल्या जाणार आहेत. शासनाकडून मच्छीमारांना जी मदत आहे ती आपण करत आहोत. सरकार आणि शिवसेना म्हणून आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी आहोत. मच्छीमारांच्या उपोषणाला आपला पाठिंबा आहेच मात्र सध्या मासेमारी हंगाम असल्याने आपले नुकसान न करता पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आमदार नाईक यांनी केली. रत्नागिरीतील एलईडी व पर्ससीन नौकांना पालकमंत्री उदय सामंत यांचाच वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याबाबत विचारले असता आमदार नाईक यांनी पालकमंत्र्यांचा एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीला विरोध आहे. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी, पर्ससीनची अनधिकृतरीत्या होणार्‍या मासेमारीला आपलाही विरोध आहे. त्यामुळेच ही मासेमारी रोखण्यासाठी कडक कायदा येत्या काळात केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्ससीनधारकांनी समुद्रात अवैधरीत्या मासेमारी करताना पकडले जाणारे हायस्पीड ट्रॉलर्स हे विविध राज्यातील मंत्र्यांचे लागेबांधे असल्यानेच सोडण्यात आले असा आरोप केला होता. यावर आमदार नाईक म्हणाले, कोणत्या मंत्र्यांचे लागेबांधे असले तरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत होणार्‍या अवैध मासेमारीवर कडक कारवाई व्हायलाच हवी यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत असे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा