निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटक बोटींना बंदर विभागाचा इशारा
खोल समुद्रातील बोट सफरीवर निर्बंध; नियमभंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशारा
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग किनारपट्टी परिसरात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून वेंगुर्ले व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणांहून पर्यटकांना घेऊन काही बोटी निवती लाईट हाऊस परिसरातील खोल समुद्रात जात असल्याचे बंदर विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने महत्त्वाचे आवाहन करत पर्यटकांना खोल समुद्रात बोट सफरीस नेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मान्सूनपूर्व कालावधी सुरू असल्याने समुद्रात कोणत्याही क्षणी वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत खोल समुद्रात गेलेल्या प्रवासी बोटीला अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर चालू पर्यटन हंगाम संपेपर्यंत कोणीही निवती लाईट हाऊस परिसरात अथवा खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन बोट सफर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही बंदर विभागामार्फत देण्यात आला आहे.
