You are currently viewing देवगडात दुर्दैवी घटना! समुद्रात बेपत्ता झालेल्या चैतन्य गुरवचा मृतदेह २४ तासांनंतर कांदळवनात सापडला

देवगडात दुर्दैवी घटना! समुद्रात बेपत्ता झालेल्या चैतन्य गुरवचा मृतदेह २४ तासांनंतर कांदळवनात सापडला

देवगडात दुर्दैवी घटना! समुद्रात बेपत्ता झालेल्या चैतन्य गुरवचा मृतदेह २४ तासांनंतर कांदळवनात सापडला

मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी पोहताना वाहून गेला होता युवक; ड्रोनद्वारे शोधमोहीम, वडिलांनी केली मृतदेहाची ओळख

देवगड

देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात तसेच त्याच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
मुंबईतील दादर-नायगाव येथील पाच मित्रांचा समूह देवगड परिसरात पर्यटनासाठी आला होता. काल सायंकाळी पाचच्या सुमारास हे सर्व मित्र मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी गेले होते. त्यातील चार जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र समुद्रातील लाटांचा वेग आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही अचानक गटांगळ्या खाऊ लागले.
यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत तिघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र चैतन्य गुरव हा समुद्राच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन बेपत्ता झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. आज सकाळपासून मत्स्य विभागाच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्र परिसरात शोधकार्य राबविण्यात आले. स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक आणि प्रशासन दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा कोणताही मागमूस लागला नव्हता.
अखेर सायंकाळी पाचनंतर मिठमुंबरी-बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिक लक्ष्मण तारी आणि पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने होडीद्वारे मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या चैतन्यच्या वडिलांनी अत्यंत दुःखी अंतःकरणाने आपल्या एकुलत्या एक मुलाची ओळख पटवली. त्यानंतर प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या शोधमोहीमेदरम्यान तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, रवींद्र महाले, आशिष कदम, संतोष भालेराव, ग्रामसेवक रेश्मा गोळवणकर, रमेश तारी, दयानंद मुंबरकर, हेमंत तोडणकर, कदम नाईक, सुजित नाईक यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी, मच्छीमार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा