कणकवली बाजारपेठेत मध्यरात्री भीषण आग; महाडिक लेडीज टेलर्सचे लाखोंचे नुकसान
युवक, नागरिक आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली; शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज
कणकवली :
येथील बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या ‘महाडिक लेडीज टेलर्स’ या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील युवक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
आगीमुळे दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. बाजारपेठेतील दाट वस्ती आणि आजूबाजूला असलेल्या दुकानांमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र युवक, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सहभाग घेतला.
दरम्यान, नगरपंचायतीचा अग्निशामक बंब तत्परतेने घटनास्थळी दाखल झाला होता. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सध्या मे महिन्याच्या हंगामामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्र्या, रेनकोट तसेच शिलाई मशिन विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आगीत हे सर्व साहित्य जळून खाक झाले असून फर्निचर, वायरिंग आणि इंटेरियरचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे दुकान मालक प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
