महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महासोहळा ‘असंघटीत लोककलांचा महोत्सव’ सावंतवाडीत रंगणार
तीन दिवस महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला,नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य दर्शन
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “असंघटीत लोककलांचा महोत्सव” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२, २३ आणि २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह, सावंतवाडी येथे हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
सदर कार्यक्रम डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विखुरलेल्या आणि काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या लोककला प्रकारांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्राच्या ग्रामीण, आदिवासी आणि पारंपरिक लोकजीवनाचे दर्शन घडविणारे विविध लोककला प्रकार सादर होणार आहेत. लोकसंगीत, नृत्य, अभिनय, वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा रंगतदार आविष्कार या महोत्सवात अनुभवता येणार आहे.
पहिला दिवस : लोकपरंपरांचा रंगतदार प्रारंभ
शुक्रवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी महोत्सवाची सुरुवात करपल्लवी गोंधळी या पारंपरिक लोककलेने होणार आहे. त्यानंतर बहुरूपी या लोककलाकारांच्या विविधरंगी सादरीकरणातून ग्रामीण जीवनातील विनोद, सामाजिक संदेश आणि मनोरंजनाचा संगम अनुभवता येणार आहे. धनगरी ओवीच्या सुरेल सादरीकरणातून धनगर समाजाची परंपरा आणि लोकजीवन उलगडले जाणार आहे. तसेच हेळवी लोककलावंतांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकारांसह महिलांच्या पारंपरिक फुगडी आणि झिम्मा या नृत्यप्रकारांनी वातावरण उत्साहपूर्ण होणार आहे.
दुसरा दिवस : आदिवासी आणि लोकनृत्यांचा अनोखा आविष्कार
शनिवार, दिनांक २३ मे रोजी आदिवासी पाटा गायन या वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरेचे सादरीकरण होणार आहे. खेळे कळसूत्री बाहुल्यांचा या पारंपरिक कला प्रकारातून लोककथा आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध समाजघटकांची संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे रंगीबेरंगी दर्शन घडणार आहे.
तिसरा दिवस : पारंपरिक कलांचा भव्य समारोप
रविवार, दिनांक 24 मे रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी दशावतार या कोकणातील लोकप्रिय पारंपरिक नाट्यकलेचे सादरीकरण होणार आहे. कोळी नृत्यातून समुद्रकिनारी जीवनशैली आणि जलसंस्कृतीचे दर्शन घडणार असून, सोंगी मुखवटे या वैशिष्ट्यपूर्ण कला प्रकारातून लोकपरंपरेतील नाट्यमयता अनुभवता येणार आहे. दिमडी, ढोलकी, ढोल ताशा वाद्यवृंद जुगलबंदीच्या दमदार तालांनी संपूर्ण वातावरण दणाणून जाणार असून, भारुड या संतपरंपरेतील प्रबोधनात्मक लोककलेने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचा समृद्ध वारसा जपणारा हा महोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, कला रसिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
