You are currently viewing आंबोलीत सहकारी पतसंस्थांचे भव्य दोन दिवसीय अधिवेशन

आंबोलीत सहकारी पतसंस्थांचे भव्य दोन दिवसीय अधिवेशन

आंबोलीत सहकारी पतसंस्थांचे भव्य दोन दिवसीय अधिवेशन

राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; उत्कृष्ट पतसंस्थांचा होणार गौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सहकारी पतसंस्थांचे भव्य दोन दिवसीय अधिवेशन आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचे मोठे अधिवेशन होत असून, विविध कारणांनी हे अधिवेशन विशेष ठरणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी दिली.

उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांचा सन्मान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार पतसंस्था अशा विविध प्रकारच्या सुमारे १५० संस्था कार्यरत आहेत. आर्थिक व्यवस्थापन उत्तम प्रकारे करणाऱ्या आणि ५ कोटींपेक्षा अधिक खेळते भागभांडवल उभे करणाऱ्या पतसंस्थांचा अधिवेशनात गौरव करण्यात येणार आहे. गौरव प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन या संस्थांना सन्मानित केले जाणार आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, आमदार दीपक केसरकर व आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्तेही विविध संस्थांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत.

विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अधिवेशनात पतसंस्थांचे आर्थिक व्यवस्थापन, कायदे, नियम, भविष्यातील आव्हाने आणि उपाययोजना यावर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • आदर्श उपविधी विषयावर जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे मार्गदर्शन करणार
  • कर्ज वितरण व कर्जवसुलीतील अडचणींवर पुण्याचे आर. बी. यादव यांचे मार्गदर्शन
  • सायबर गुन्हे व त्यावरील उपाययोजनांबाबत पुंडलिक सातोसे यांचे सत्र
  • भविष्यातील आव्हाने व सहकारी चळवळीची दिशा यावर ॲड. दीपक पटवर्धन यांचे मार्गदर्शन
  • ताणतणाव व्यवस्थापनावर योगतज्ज्ञ अशोक देशमुख यांचे मार्गदर्शन

या दोन दिवसीय अधिवेशनात चेअरमन, संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

राज्यभरातील सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची उपस्थिती

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, संचालक सुदर्शनराव भालेराव, कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गिरिश तुळपुळे आदी मान्यवर या अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

पतसंस्थांसमोरील आव्हानांवर चर्चा

अधिवेशनात संगणकीय तंत्रज्ञान, नव्याने विकसित होत असलेले एआय तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन आणि सहकारी क्षेत्रातील विविध आव्हानांवर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रातून पतसंस्थांना अधिक बळकटी देणे व योग्य दिशेने मार्गक्रमण घडवणे हा प्रमुख उद्देश असल्याचे सुनिल राऊळ यांनी सांगितले.

फेडरेशनच्या संचालक मंडळाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे धाडसी पाऊल उचलल्याचे सांगत राऊळ यांनी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अधिवेशनासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वागत कमानी, बॅनर तसेच आर्थिक सहकार्य करण्यात आले असून अनेक संस्थांनी अधिवेशन प्रायोजित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा